Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Swing Trading Advantages & Disadvantages: स्विंग ट्रेडिंगचे फायदे–तोटे काय आहेत ते जाणून घ्या

Swing Trading Advantages & Disadvantages

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचा एक पर्याय म्हणजे Swing Trading. स्विंग ट्रेडिंग मध्ये अस काय आहे ज्यामुळे ट्रेडिंगचा हा पर्याय अवलंबला जातो? तसेच त्याचे तोटे काय आहेत? आणि Swing Trading म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊया.

Swing trading च्या फायद्या-तोट्याकडे वळण्यापूर्वी आधी Swing Trading म्हणजे काय ते  जाणून घेऊया.  Swing Trading म्हणजे काय, हे  आपल्या शेअर्स होल्ड करण्याच्या कालावधीवरुन ठरते. आपण खरेदी केलेला शेअर दोन दिवसांनी किवा काही महीने – वर्ष या कालावधीनंतरही विकला जातो. सामान्यपणे स्विंग ट्रेडिंग म्हणजे आज घेतलेला शेअर दोन दिवस ते दोन महिने पर्यंत होल्ड करून  ठेवणे होय. यालाच आपण शॉर्ट टर्म ट्रेडिंग देखील म्हणू शकतो. अर्थात हा टाइम पिरीयड ढोबळपणे लक्षात घ्यायला हवा. काही जण एक आठवडा ते 15 दिवस तर काही जणांकडून  महिनाभरापर्यंतच्या कालावधीपर्यंत शेअर्स होल्ड करून विकण्याला swing trading असे म्हटले जाते.

स्विंग ट्रेडिंग हे  डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये येते. एका उदहरणाच्या सहाय्याने आपण समजून घेऊ. समजा  तुम्ही एखाद्या कंपनीचे 100 रुपयाचे 10 शेअर्स विकत घेतलेत. तुम्ही अल्प कालावधीसाठी हे शेअर्स घेतले आहेत. आता 4 दिवसांनी हे शेअर्स 3 टक्क्यांनी वाढले  तर अशा वेळी तुम्ही ते विकून आपला नफा बूक करता. Swing trading मध्ये हा कालावधी लहान असतो. हेच तुम्ही intraday , scalping किवा पोझिशनल ट्रेडिंग करायला गेलात तर त्याचा टाइम पिरीयड हा वेगवेगळा असतो.

इंट्राडे ट्रेडिंग करत असताना जर तो शेअर लॉस मध्ये असेल तर आपण डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो. आपण निराश होऊ शकतो . परंतु स्विंग ट्रेडिंग मध्ये तसं होत नाही तर आपण घेतलेला शेअर आज जरी लॉस मध्ये असेल तरी उद्या किंवा येणाऱ्या काही काळात तो शेअर प्रॉफिट देण्याची शक्यता असते. 

स्विंग ट्रेडिंग चे फायदे काय आहेत? ( Advantages of Swing Trading )

स्विंग ट्रेडिंगला कित्येक गुंतवणूकदार प्राधान्य देतात. याद्वारे अनेक जण पैसे मिळवत असतात. रिस्क कमी, जास्त प्रॉफिट आणि टेक्निकल अनॅलिसिस किवा फंडामेंटल अनॅलिसिस यांचा सखोल अभ्यास करण्याची गरज नसणे असे काही याचे फायदे आहेत. एक एक समजून घेऊ. 

Intra day च्या तुलनेत रिस्क कमी 

स्विंग ट्रेडिंग चा  पहिला फायदा हा सांगितला जातो की, त्यामध्ये रिस्क कमी आहे. विशेषत: इंट्राडेच्या तुलनेत हे सांगितले जाते. कारण डे ट्रेडिंग मध्ये आपल्याला आज घेतलेला शेअर्स आजच विकावा लागतो अगदी तोटा सहन करावा लागला तरी. मात्र स्विंग ट्रेडिंगमध्ये त्याच दिवशी विकण्याचे बंधन नसल्याने आपल्याला अपेक्षित असलेला नफा मिळवण्यासाठी काही दिवस शेअर्स होल्ड करून ठेवता येतो. शेअर्सचा भाव पडला तरी त्याच दिवशी विकण्याची सक्ती नसल्याने नुकसान टाळणे काही वेळा शक्य होऊ शकते. मात्र इथे हे ही लक्षात घ्यायला हवे की,  इंट्राडे मध्ये आपण घेतलेला शेअर डिलिव्हरी मध्ये कन्व्हर्ट करू शकतो परंतु त्यासाठी पुरेसे पैसे असणे आवश्यक असते. 

प्रॉफिट तुलनेने जास्त होतो असे आढळते 

Swing Trading मध्ये Intra day च्या तुलनेत प्रॉफिट जास्त होतो असे आढळते. जेव्हा एखादा शेअर डाऊन ट्रेण्ड मध्ये येतो ना,  तेव्हा तो शेअर ठराविक लेव्हलला सपोर्ट घेऊन पुन्हा वर जातो असे दिसते. अशा वेळी  जो शेअर वर चालला आहे तो कित्येकदा  एका दिवसात वर जात नाही. जेव्हा तो शेअर अपट्रेंडमध्ये असेल तेव्हा आपण इन्ट्राडे पेक्षा स्विंग ट्रेडिंग मध्ये जास्त प्रॉफिट मिळवला जाऊ शकतो.  जोपर्यंत तो शेअर वरच्या दिशेने वाढ होत चालला आहे तोपर्यंत आपल्याला  प्रॉफिट बूक करण्याची संधी मिळते आणि जेव्हा आपले टार्गेट प्राइज पूर्ण  होईल तेव्हा तो शेअर आपण विकू शकतो किंवा त्या शेअरचा स्टॉपलॉस ट्रेल करणे शक्य होईल.

 सखोल अभ्यास न करताही कर ट्रेडिंग करता येते  

फंडामेंटल व टेक्निकल अनॅलिसिसचा सखोल अभ्यास करण्याची गरज नाही, ही Swing Trading ची जमेची बाजू म्हणता येईल. अनेक गुंतवणूकदार केवळ न्यूजच्या बेसिसवर ट्रेडिंग करताना आढळून येतात. काही जणांना टेक्निकल अनॅलिसिस किवा फंडामेंटलचे सखोल ज्ञान नसते असे आढळून येते. यामुळे टेक्निकल मधील किचकट वाटू शकणारे चार्ट वाचणे किवा एखादी कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे किवा नाही ते तपासणे हे वेळखाऊ असते. आणि ज्यासाठी विशेष अभ्यासाची गरज असते. ते यात पूर्णपणेही काही वेळा टाळले जाते. मात्र तरीही एखाद्या कंपनीचा फंडामेंटल अभ्यास फायदेशीर ठरतो आणि टेक्निकल अभ्यासचाही कित्येक गुंतवणूकदार Swing Trading साठी उपयोग करून घेतात आणि त्याचाही त्यांना चंगला फायदा होतो, हे याठिकाणी लक्षात घ्यायला हवे. 

स्विंग ट्रेडिंग चे तोटे (Disadvantages of Swing Trading)

रिस्क कमी, जास्त प्रॉफिट आणि टेक्निकल अनॅलिसिस किवा फंडामेंटल अनॅलिसिस यांचा सखोल अभ्यास करण्याची गरज नसणे असे काही याचे फायदे सांगितले जात असले तरी याचे काही तोटे देखील आहेत. ते देखील लक्षात घ्यायला हवे. 

मार्जिन नसल्याने जास्त पैशांची गरज

स्विंग ट्रेडिंग मध्ये मार्जिन मिळत नाही हा याचा एक महत्वाचा तोटा म्हणता येईल.  त्यामुळे स्विंग ट्रेडिंग साठी जास्त पैशांची आवश्यकता असते.  मार्जिन  हे इंट्राडे ट्रेडिंगसाठी मिळते. मार्जिन मुळे आपल्याला  कमी पैशात जास्त शेअर घेता येतात. कसे ते एका उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ. समजा तुमच्याकडे 5 हजार रुपये आहे आणि एखादा 500 रुपये किमतीचे  शेअर्स तुम्हाला विकत घ्यायचे  आहेत. अशा वेळी स्विंग ट्रेडर केवळ 10 च शेअर्स विकत घेऊ शकतो कारण त्याला मार्जिन मिळत नाही. ही सुविधा उपलब्ध असताना आपल्याकडे 5 हजार रुपये असतानाही जर दहापट मार्जिन असेल तर 10 ऐवजी 100 शेअर्स विकत घेता येतात. यामुळे जर समजा 3 टक्के प्रॉफिट धरला तर जिथे 10 शेअर्समध्ये 150 रुपये मिळाले  तर तिथेच मार्जिन असताना हा प्रॉफिट 1 हजार 500 रुपयापर्यंत वाढला  असता. यामुळे मार्जिन नसणे हा स्विंग ट्रेडिंगचा तोटा म्हणता येईल. पण, याचवेळी हे ही लक्षात घ्यायला हवे की, दरवेळी एखाद्या शेअर्स मध्ये फायदा होईल असे नाही. काही वेळा खरेदी केल्यावर शेअर्सच्या किमती घसरू देखील शकतात. अशा वेळी जिथे 150 रुपये तोटा होणार होता तिथे मार्जिनमुळे  1 हजार 500 रुपये  तोटा होऊ शकतो, हे ही इथे लक्षात घ्यायला हवे. यामुळे काही वेळा  उलट हा swing trading चा फायदा म्हणून देखील गणला जातो. कारण मार्जिन नसल्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त शेअर घेतले जात  नाही आणि त्यामुळे  नुकसान देखील  कमी होते.

ओवरनाईट  रिस्क असते 

स्विंग ट्रेडिंग मध्ये घेतलेला शेअर आपण एका दिवसापेक्षा जास्त वेळ होल्ड करून ठेवत असतो.  यामुळे इथे ओवरनाईट  रिस्क अस्तित्वात असते.हे कसे ते उदहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया. समजा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. अशा वेळी आपण घेतलेल्या शेअर विषयी काही निगेटिव्ह न्यूज आली तर त्यात आपले नुकसान होण्याची शक्यता असते.कारण शेअर बाजार खुला होतानाच त्या शेअर्समध्ये घट झालेली असू शकते.   म्हणजे एखादा शेअर जर दुसऱ्या दिवशी गॅप डाउन ओपन झाला तर यामध्ये  आपले नुकसान होण्याची शक्यता असते.  डे ट्रेडिंगमध्ये त्याच दिवशी विक्री होत असल्याने हा धोका नसतो. मात्र तिथे वेगळ्या प्रकारची रिस्क असते ज्याची आपण Swing Trading च्या  फायद्यामध्ये चर्चा केली आहे. 

थोडक्यात,  scalping , intra-day यासारख्या ट्रेडिंगप्रमाणे  Swing Trading हा देखील शेअर बाजारात गुंतवणूकीचा एक आकर्षक पर्याय आहे. त्याचे जसे Advantages  आहेत, तसे disadvantages देखील आहेत. रिस्क कमी, जास्त प्रॉफिट आणि टेक्निकल अनॅलिसिस किवा फंडामेंटल अनॅलिसिस यांचा सखोल अभ्यास करण्याची गरज नसणे असे काही याचे फायदे तर मार्जिन नसल्याने पैशांची जास्त गरज आणि ओवरनाइट रिस्क हे तोटेदेखील आहेत. आपल्या क्षमता, आपली आर्थिक उद्दिष्टे तसेच आपल्याकडे यासाठी उपलब्ध असणारा वेळ याचा सारासार विचार करून  स्विंग ट्रेडिंग आपल्यासाठी आहे का, याचा  निर्णय घेणे योग्य ठरते. 

(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)