नोकरकपातीचा सर्वात जास्त फटका माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला बसला आहे. कोरोनाकाळात डिजिटल सेवांची मागणी वाढल्याने कंपन्यांकडून अतिरिक्त नोकरभरती करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांना रग्गड पॅकेजही देण्यात आली. मात्र, कोरोनाची साथ ओसरल्यानंतर या कंपन्यांच्या नफ्यानेही तळ गाठला. त्यामुळे आता देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून नोकरकपातीच्या बातम्या येत आहे. कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना आता नवी नोकरी मिळण्यात अडचणी येत आहे. प्रामुख्याने पगारात तडजोड करावी लागत आहे.
गुगल, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक सह अनेक बलाढ्य मल्टिनॅशनल कंपन्यांनी नोकर कपात केली. या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना भली मोठी पॅकेजेस दिली होती. मार्केटमधील स्पर्धेपेक्षा जास्त रकमेची पॅकेजेस कर्मचाऱ्यांना दिली. फक्त या बड्या कंपन्यांच नाही तर तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्सनेही पॅकेज जास्त दिले होते. आता नफा कमी झाल्याने नोकरकपात सुरू आहे. मात्र, ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येत आहे त्यातील अनेकांना नोकरी मिळत नाही.
पगारात करावी लागतेय तडजोड?
कंपन्यांकडून लेऑफ म्हणजेच कामावरून काढून टाकताना पुढील काही महिन्यांचा पगार आणि इतर सुविधा जसे की विमा देण्यात येतो. मात्र, त्यानंतर काय? हे पैसे किती दिवस पुरणार. सध्या जॉब मार्केट आक्रसले असून नव्या संधी अगदी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. या संधीचा फायदा कंपन्याही घेत आहेत. जॉब हातात नसलेल्या कर्मचाऱ्यांना आधी जो पगार होता त्यापेक्षा कमी पगाराची नोकरी ऑफर करण्यात येत आहे. मोठ्या कंपन्यांकडून जॉबसाठी फोनही येत नाहीत. ज्या काही थोड्या संधी उपलब्ध आहेत, त्या स्टार्टअप कंपन्यांमधील असून त्यांची जास्त पैसे खर्च करण्याची क्षमता नाही. त्यामुळे पुन्हा कामावर रूजू व्हायचे असेल तर या कर्मचाऱ्यांना तडजोड करावी लागत आहे.
ओव्हर क्वालिफाइड
वरिष्ठ पदावरून काढून टाकलेले कर्मचारी, मोठ्या टेक कंपन्यांतील कर्मचारी दुसऱ्या नोकरीसाठी ओव्हरक्वालिफाइड ठरत आहेत. म्हणजेच, त्यांची जे काम करण्याची क्षमता आहे, त्यापेक्षा सोपे काम करण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. तसेच त्यांच्याकडे जी कौशल्ये आहेत. ती कौशल्ये नव्या कंपनीत कामाची ठरत नाहीत. त्यामुळे पुन्हा नवे स्किल्स आत्मसात करावे लागत आहेत. आधीच कमी पगाराची ऑफर त्यावे कौशल्य आत्मसात केले नाही तर पुन्हा नोकरी जाण्याची भीती यामुळे कर्मचाऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
EMI, कर्ज असणाऱ्यांच्या अडचणीत वाढ
मेट्रो शहरामध्ये राहत असताना अनेक कर्मचाऱ्यांनी स्वत:चे घर घेतले आहे. नोकरी गेल्याने EMI भरणेही अवघड झाले आहे. नवी नोकरी शोधेपर्यंत मासिक खर्च बचतीमधून करावा लगात आहे. त्याच जर वाहन, गृह किंवा वैयक्तिक कर्जाचा बोजा असेल तर पैशांचे व्यवस्थापन आणखी अवघड होऊन बसत आहे. अनेकांनी दीर्घकालीन गुंतवणूक काढून खर्च भागवण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत माहिती तंत्रज्ञान क्षेत्र पुन्हा रुळावर येईल असे बोलले जात आहे.