जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. रेल्वे सेवा ही भारतीयांसाठी जीवन वाहिनी समजली जाते. यामागचे प्रमुख कारण म्हणजे रेल्वेच्या माध्यमातून दररोज 2 कोटींपेक्षा अधिक नागरिक प्रवास करतात. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखरूप व आरामदायी व्हावा, यासाठी सरकारकडून देखील सातत्याने रेल्वे सेवांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. याशिवाय, नवीन ट्रेन्सचा देखील सुरू केल्या जात आहेत.
सरकारकडून वंदे भारत एक्सप्रेसच्या पाठोपाठ आता सर्वसामान्यांना परवडेल अशी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे. सर्व सोयी सुविधांसह येणाऱ्या या ट्रेनचे भाडे देखील कमी आहे. अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनची वैशिष्ट्ये काय आहे व यातून प्रवास करण्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन काय आहे?
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींद्वारे 2 अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन्सला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. या ट्रेन्सचा मार्ग दरभंगा-अयोध्या धाम जं. आनंद विहार टर्मिनल आणि मालदा टाउन - सर एम. विश्वेश्वरेया टर्मिनस (बंगळुरू) असा असेल. विशेष म्हणजे लवकरच देशभरात 50 अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन्स धावताना दिसणार आहेत.
अमृत भारत ट्रेन्सची निर्मिती चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये झाली आहे. ही एक Linke Hofmann Busch (LHB) पुल-पुश डिझाइन व नॉन-एसीसह येणारी हाय-स्पीड पॅसेंजर ट्रेन आहे. कॉपलर तंत्रज्ञानासह येणाऱ्या या ट्रेनमध्ये पुढे व मागे दोन्ही बाजूला इंजिनची सुविधा देण्यात आली आहे. पुढील इंजिन ट्रेनला ओढण्याचे काम करते, तर मागील इंजिन ढकलण्याचे काम करते. या तंत्रज्ञानामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर पार करता येते.
अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये खास काय?
या ट्रेनमध्ये एकूण 22 डब्बे असून, यातील 12 द्वितीय श्रेणीचे स्लिपर कोच, 8 डब्बे अनारक्षित प्रवाशांसाठी व 2 गार्ड कंपार्टमेंट्स आहेत. केशरी रंगात येणाऱ्या या ट्रेनमध्ये दिव्यांगांना कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास करता यावा, यासाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे. ट्रेनचा वेग ताशी 130 किमी आहे. ही ट्रेन दिसायला मेट्रोसारखी असून, एका डब्ब्यातून दुसऱ्या डब्ब्यात देखील जाता येते.
प्रत्येक सीटजवळ चार्जिंग पॉइंट देण्यात आले आहे. तसेच, यात सीसीटीव्ही कॅमेरे, बायो-वॅक्यूम वॉशरूम, सेंसरसह येणारे नळ, एलईडी लाइटची सुविधा मिळते. तिकिट दरांबद्दल सांगायचे तर स्लीपर क्लासमधून प्रवास करण्यासाठी 46 रुपयांपासून ते 1469 रुपये खर्च करावे लागतील. प्रवासाच्या अंतरावरून तिकीट दरात बदल होईल.