Credit Card Bill: क्रेडिट कार्डचे वेळेपूर्वी म्हणजेच मुदत संपण्यापूर्वी बिल भरल्याचे खूप सारे फायदे आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या चांगल्या सवयीमुळे तुमचा क्रेडिट स्कोअर स्ट्ऱाँग होतो. क्रेडिट स्कोअर स्ट्राँग ठेवण्यासाठी सतत पेमेंट वेळेवर भरणे खूप महत्त्वाचे आहे. या नेहमीच्या सवयीमुळे प्रत्येक ग्राहकाची पेमेंट हिस्ट्री तयार होत असते. बँका कर्ज देताना किंवा क्रेडिट स्कोअर ठरवताना मागील पेमेंट कशा पद्धतीने भरली गेली. याचा आढावा घेतात आणि त्यानुसार रेटिंग देतात. तर आज आपण या चांगल्या सवयीबरोबरच आणखी कोणते घटक आहेत. ज्यामुळे क्रेडिट कार्डधारकाचा फायदा होतो. ते पाहणार आहोत.
Table of contents [Show]
बिलिंग हिस्ट्रीमध्ये दंड दिसत नाही
क्रेडिट कार्डचे बिल वेळेपूर्वी भरणे म्हणजे स्वत:ची दंडातून सुटका करून घेणे. तुम्ही जर मुदतीनंतर बिल भरले तर तुमच्याकडून दंड म्हणून बिलावर चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारले जाते. त्याचबरोबर तुमच्या पेमेंट हिस्ट्रीमध्ये भरलेला दंड सातत्याने दिसत राहतो. तो पेमेंट हिस्ट्रीमध्ये दिसू नये, म्हणून मुदतीपूर्वी बिल भरल्याचा असाही फायदा होतो.
क्रेडिट युटिलायझेशन कमी होते
क्रेडिट कार्डवर सवलत मिळते म्हणून त्याचे उशिरा पेमेंट करणे ही सवय आर्थिक शिस्तीला धरून नाही. जसे पैसे उशिराने भरण्यासाठी क्रेडिट मिळते. तसेच पैसे किंवा बिल लवकर भरल्यावर कार्डधारकाला काही फायदे मिळतात. त्यातील महत्त्वाचा फायदा म्हणजे क्रेडिट युटिलयझेशन, याचा अर्थ तुमच्या क्रेडिट कार्डमधील शिल्लक रक्कम आणि आणि क्रेडिट लिमिटचे प्रमाण. तुम्ही जर क्रेडिट कार्डची बिले मुदतीपूर्वी भरली तर तुमच्या नावे असलेली थकबाकीची रक्कम कमी होते आणि आपोआप क्रेडिट मर्यादा मूळ रकमेवर येते. याचा तुम्हाला पुढील खरेदी करण्यासाठी फायदा होतो. तसेच यावरून असेही दिसून येते की, तुम्ही सर्वस्वी क्रेडिटकार्डवर अवलंबून नाहीत. परिणामी तुमचा पेमेंट हिस्ट्रीचा रेकॉर्ड अधिक स्ट्राँग होतो.
क्रेडिट स्कोअर वाढतो
क्रेडिट कार्डचा वापर करताना फक्त क्रेडिटचा विचार करून चालत नाही. ते क्रेडिट सातत्याने मिळत राहो. यासाठी क्रेडिट स्कोअर मेन्टेन ठेवणे हे ही तितकेच गरजेचे आहे. क्रेडिट स्कोअर चांगला राहण्यासाठी तुमची पेमेंट हिस्ट्री खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. कार्डधारकाने सातत्याने मुदतीपूर्वी बिले भरल्यास त्याचा क्रेडिट स्कोअर वाढतो.
अतिरिक्त व्याज भरावे लागत नाही
क्रेडिट कार्डची बिले लवकरात लवकर भरल्याने सर्वप्रथम तुम्ही दंडापासून आणि अतिरिक्त व्याज भरण्यापासून स्वत:ची सुटका करता. यामुळे तुमच्या पेमेंट हिस्ट्रीमध्ये सुरुवातीपासूनच एक चांगला क्लीन रेकॉर्ड तयार होतो. त्यामुळे तुमचे क्रेडिट वाढण्यास मदत होते.
अशाप्रकारे क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यानंतर त्याची बिले मुदत संपेपर्यंत वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही. उलट मुदत संपल्यानंतर बिल भरले तर त्यावर तुम्हाला दंड भरावा लागतो. पण मुदतीपूर्वी बिले भरल्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला राहण्यास मदत होते. तसेच तो वाढण्यास मदतही होते.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            