प्रत्येक व्यक्ती आपल्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल आणि सुरक्षित करण्यासाठी धडपडत असतो. यात शिक्षणासह, उच्चशिक्षण आणि त्याच्या लग्नानंतरच्या आयुष्यासाठी घरही तयार करून देत असतो. भविष्यात आपल्या मुलांना कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही, यासाठी पालक सर्वतोपरी काळजी घेत गुंतवणूक करत असतात. प्रत्येक जण आपापल्या माहितीनुसार आणि आर्थिक उत्पन्नाच्या आधारावर गुंतवणूक करत असतो. यासाठी बहुतांश कंपन्यांनी मुलांच्या भवितव्याशी निगडीत बाजारात योजना आणल्या आहेत.
सरकारी इन्श्युरन्स कंपनी एलआयसी आणि पोस्ट खात्याने (LIC & Post Office) सुद्धा मुलांसाठी इन्श्युरन्सशी निगडीत काही योजना आणल्या. एलआयसीच्या योजनांची माहिती आपल्याला साधारणपणे वर्तमानपत्रातून आणि जाहीरातींतून मिळते. पण पोस्टाच्या योजना फारशा लोकांपर्यंत पोचत नाहीत. पोस्टाकडून मुलांच्या भवितव्यासंबंधीची सुरू करण्यात आलेल्या बहुपयोगी बाल विमा योजनेची माहिती आपण घेणार आहोत.
बाल विमा योजना काय आहे?
भारतीय पोस्ट खात्याने मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बाल विमा योजना (Bal Vima Yojana) आणली आहे. टपाल खाते हे ग्रामीण भागापासून दुर्गम भागापर्यंत पोचलेले आहे. म्हणून ग्रामीण भागातील नागरिक या योजनेच्या मदतीने मुलाचे भवितव्य चांगले करू शकतात. या योजनेत कोणताही व्यक्ती गुंतवणूक करू शकतो. मॅच्युरिटीच्या कालावधीनंतरही संबंधित व्यक्ती इन्श्युरन्सची सगळी रक्कम मिळवू शकतो.
बाल विमा योजनेची वैशिष्ट्ये
पोस्टाच्या बाल विमा योजनेची वैशिष्ट्ये ही खासगी कंपन्यांच्या विमा योजनेच्या चिल्ड्रन इन्शुरन्स प्लॅनपेक्षा वेगळी आहेत. या योजनेची पात्रता ही पाच वर्ष ते 20 वर्षापर्यंत आहे. पाच वर्षाच्या वयोगटातील मुलांसाठी ही योजना खरेदी करू शकतो. ही योजना खरेदी करणार्या पालकांचे कमाल वय 45 वर्ष असू शकते. पोस्टाची बाल विमा योजना ही कमाल दोन मुलांसाठी घेता येते. अर्थात ही योजना एका कुटुंबातील केवळ दोन मुलांना कवच प्रदान करते. या पॉलिसीत नॉमिनी बदलण्याची सुविधा आहे.
पॉलिसीमधील जोखीम कवच किती आहे?
या पॉलिसीचे कमाल जोखीम कवच तीन लाख रुपये आहे. पॉलिसी परिपक्वतेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर जोखीम कवचाची रक्कम ही बोनसबरोबर विमाधारकाला दिली जाते. परिपक्वता कालावधीपर्यंत त्याचा हप्ता पालकांकडून भरला जातो. विशेष म्हणजे पालकाची जोखीम देखील यात सामील होते. पालकाचा मृत्यू झाल्यास पाल्याला किंवा वारसदाराला पॉलिसीचा हप्ता भरण्याची गरज नाही आणि योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कवचाची रक्कम ही संबंधितास प्रदान केली जाते. याशिवाय पॉलिसीधारकाच्या अपत्याचा मृत्यू होत असेल तर इन्श्युरन्स कंपनी ही जोखीम कवचाची रक्कम आणि बोनसची रक्कम पालकांना देते. बोनसची रक्कम ही प्रति 50 हजार रुपयांपेक्षा अधिक असते.
मेडिकल चाचणीची गरज नाही
एखादा पालक पाल्यासाठी विमा योजना खरेदी करत असेल तर मुलाची किंवा त्याची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज नाही. कारण मुलांमध्ये आजारपणाचे प्रमाण कमी असते. एखाद्या मुलाला आजारपण असेल तर ते अपवादात्मक राहते. पालकाचे कमाल वय 45 ठेवले आहे. यापर्यंतच्या वयोगटातील व्यक्तीची तब्येत चांगली राहते.
आवश्यक कागदपत्रे
पोस्टाच्या बाल जीवन विमा योजनेसाठी अर्ज भरताना पालकाला मुलाचे आणि स्वत:चे ओळखपत्र सादर करावे लागते. आधार कार्ड, रेशन कार्ड आदीच्या साक्षांकित प्रती जोडाव्या लागतात. तसेच जन्मतारखेचा दाखला, रहिवासी पुरावा, पासपोर्ट आकाराचे फोटो याची आवश्यकता असते.
कर्ज मिळत नाही
पोस्टाच्या बाल जीवन विमा योजनेवर कोणत्याही प्रकारचे बँक कर्ज किंवा पोस्टाकडून कर्ज मिळत नाही. अर्थात या योजनर्तंगत पालक पेड-अप प्लॅनची सुविधा घेऊ शकतो. यासाठी सलग पाच वर्ष हप्ता नियमितपणे भरणे गरजेचे आहे. यापेक्षा कमी कालावधीसाठी हप्ता भरला तर टपाल खाते पेड प्लॅन बदलण्याची सुविधा देत नाही.