प्रत्येक वाहन धारकाकडे विमा असणे अत्यंत आवश्यक बाब आहे. नवीन वाहन खरेदी करताना सुरुवातीचे काही वर्ष तुम्हाला कंपनीकडून विमा मोफतही मिळतो. मात्र, त्यानंतर तुम्हाला स्वत: वाहनासाठी विमा खरेदी करावा लागतो. वाहनाचा अपघात झाल्यास, चोरी गेल्यास किंवा इतरही कोणते नुकसान झाल्यास विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई देते. ज्या वर्षी तुम्ही विमा काढता मात्र, एकही दावा करत नाहीत. अशा वेळी अनेक विमा कंपन्या पुढील वर्षी नो क्लेम बोनस ग्राहकांना देऊ करतात. पुढील वर्षासाठी पॉलिसी खरेदी करताना प्रिमियमवर बोनस मिळतो.
पहिल्यांदा कार खरेदी करताना नो क्लेम बोनस ही सुविधा मिळत नाही. मात्र, त्यापासून पुढील वर्षी पॉलिसी घेताना जर तुम्ही आधी दावा केला नसेल तर नो क्लेम बोनस मिळेल.
नो क्लेम बोनसची रक्कम किती?
अनेक कंपन्यां नो क्लेम बोनसबाबत वेगवेगळ्या ऑफर्स देतात. पुढील वर्षासाठी तुम्हाला २० ते ५० टक्के प्रिमियवर सूट मिळू शकते. मात्र, एकदा हा बोनस मिळाला आणि त्याच वर्षी तुम्ही नुकसान भरपाईचा दावा केला तर तुम्हाला त्यापुढील वर्षी नो क्लेम बोनस मिळणार नाही. अनेक कंपन्या विमा काढताना नो क्लेम बोनस देतात. मात्र, त्याच वर्षात जर दावा केला तर बोनसची रक्कम भरावी लागेल, अशी अट घालतात. जर तुम्ही सलग ३ ते ५ वर्ष विम्याचा एकही दावा केला नाही तर तुम्हाला ३५ ते ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.
शुल्लक गोष्टींसाठी दावा करु नका
विमा कंपनीकडे दावा करताना किती रकमेचा दावा करत आहात याचा एकदा विचार करा. बऱ्याच वेळा लहान रक्कम म्हणजे दोन तीन हजार रुपयांचा दावा तुम्ही केला तर पुढील वर्षी तुम्हाला नो क्लेम बोनस मिळणार नाही. जर दाव्यापेक्षा पुढील वर्षी मिळणाऱ्या नो क्लेम बोनसची रक्कम जास्त असेल तर दावा न केलेलेच चांगले. समजा, तुम्ही मागील ३ वर्षांपासून नुकसानीचा कोणताही दावा विमा कंपनीकडे केला नाही. मात्र, चौथ्या वर्षी ३ हजार रुपयांचा दावा करण्याची गरज पडली तर दावा न केलेलेच बरे. कारण, त्याच्या पुढील वर्षी तुम्हाला कदाचित पाच ते सहा हजार रुपये नो क्लेम बोनसच्या रुपाने मिळणार असतील.
विमा कंपनी बदलली तरी नो क्लेम बोनस मिळतो
चांगली सुविधा न मिळणे किंवा इतर काही कारणांमुळे जर तुमच्यावर विमा कंपनी बदलण्याची वेळ आली तरीही तुम्हाला नवीन कंपनीकडून नो क्लेम बोनस मिळू शकतो. मात्र, त्याआधी तुम्ही कोणताही कोणताही दावा केलेला नसावा.
नो क्लेम बोनस कधी लागू होत नाही -
एका वर्षातील कंपनीने ठरवून दिलेल्या दाव्यांची मर्यादा तुम्ही ओलांडली तर तुम्हाला बोनस मिळत नाही. तसेच पॉलिसी संपल्यानंतर जर तुम्ही ९० दिवसांच्या आत पॉलिसीचे नूतनीकरण केले नाही तर तुम्हाला ही ऑफर मिळणार नाही. गाडी अधिकृत गॅरेजमध्येच दुरुस्त करावी, अन्यथा हा फायदा मिळू शकत नाही. पॉलिसी काढताना किंवा क्लेम करताना याआधी जर तुम्ही काही बनावट माहिती जमा केली असेल तर तुम्हाला ही ऑफर लागू होणार नाही.