केफिन टेक्नॉलॉजीसच्या शेअरने आज गुरुवारी 29 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणूकदारांची निराशा केली. केफिन टेक्नॉलॉजीसचा शेअर बीएसईवर 369 रुपयांवर लिस्ट झाला. आयपीओसाठी कंपनीने प्रती शेअर 366 रुपये दर निश्चिक करण्यात आला होता.
राष्ट्रीय शेअर बाजारात केफिन टेक्नॉलॉजीसचा शेअर 367 रुपयांवर सूचीबद्ध झाला. त्यात किंचित 0.27% वाढ झाली. मात्र त्यानंतर हा शेअर 3% घसरला. केफिन टेक्नॉलॉजीसने समभाग विक्रीतून 1500 कोटींचा निधी उभारला. केफिन टेक्नॉलॉजीसच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. केफिन टेक्नॉलॉजीसचा आयपीओ 2.59 पटीने सबस्क्राईब झाला होता. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचा राखीव हिस्सा 4.17 पटीने सबस्क्राईब झाला होता. मात्र आज प्रत्यक्षात नोंदणी निराशाजनक ठरली.
मागील साडे तीन वर्षात कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. मात्र आर्थिक वर्ष 2020 मध्ये कंपनीच्या नफ्यात घसरण झाली तर आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीला तोटा झाला होता. आज लिस्टिंगमध्ये निराशा झाली असली तरी ज्यांना आयपीओमध्ये शेअर प्राप्त झाले आहेत अशा गुंतवणूकदारांनी 340 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा आणि 380 रुपयांचे टार्गेट ठेवावे असा सल्ला स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे शेअर बाजार विश्लेषक प्रवेश गौर यांनी दिला.
केफिन टेक्नॉलॉजीसमध्ये गुंतवणूक केलेल्या जनरल अटलांटिक सिंगापूर फंड या कंपनीकडून आयपीओमध्ये संपूर्ण हिस्सा विक्री करण्यात आला. केफिन टेक्नॉलॉजीस ही म्युच्युअल फंड उद्योगासाठी सेवा देणारी कंपनी आहे. कंपनीकडून भारतातील 41 पैकी 24 फंड कंपन्यांना सेवा देते. म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी दिला जाणाऱ्या सेवांमध्ये केफिन टेक्नॉलॉजीसचा 59% हिस्सा आहे.