हल्ली अनेकजण स्वतःचे घर खरेदी करण्याऐवजी भाड्याने घर खरेदी करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे कर्जाची टांगती तलवारही डोक्यावर राहत नाही आणि कर सवलतीचा लाभही घेता येतो. याशिवाय आपल्या इच्छेनुसार आपल्याला आवडणाऱ्या घरामध्ये राहण्याची मुभा मिळते. एप्रिल ते मार्च या नवीन आर्थिक वर्षात लोक घर भाडे करार (House Rent Agreement) करतात. तुम्हीही नवीन आर्थिक वर्षात तुमच्या घराचा भाडे करार करणार असाल, तर त्यामध्ये काही गोष्टी नमूद करणे गरजेचे आहे. त्या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
घरभाडे करारात मासिक भाडे नमूद करा
घरभाडे करार हा सहा ते अकरा महिन्यांचा असतो. या करारात केवळ मासिक घर भाड्याचा (Monthly Rent) उल्लेख करा. सोबतच घर मालकाकडून घरभाडे भरलेल्या पावत्या देखील घ्यायला विसरू नका. जर तुमच्याकडे पुरावा म्हणून मासिक घर भाडे भरलेल्या पावत्या नसतील, तर तुम्हाला कर सवलतीचा लाभ घेता येत नाही. नोकरदार व्यक्ती त्याच्या पगारातील HRA या घटकावर कर सवलत मिळवू शकतो.
कालावधी नमूद करणे
तुम्ही ज्या दिवसापासून घरात राहायला जाणार आहात किंवा राहायला गेला आहात त्याच दिवसापासून घर भाडे करार सुरु करा. प्रामुख्याने 11 महिन्यांचा हा करार भाडेकरू आणि घरमालकाकडून बऱ्याच वेळा वाढवला जातो. घरभाडे करार केल्याने घरमालक आणि भाडेकरू कायदेशीरदृष्ट्या एकमेकांना बांधिल राहतात. याशिवाय करारातील कालावधीमुळे घरमालक भाडेकरूला अचानक घर खाली करण्यासाठी सांगू शकत नाहीत. त्यामुळे भाडेकरूला सुरक्षितता मिळते.
जुन्या कर प्रणाली अंतर्गत मिळेल कर सवलतीचा लाभ
सध्या देशात दोन कर प्रणाली अस्तिवात आहेत. एक जुनी आणि दुसरी नवीन कर प्रणाली. नवीन कर प्रणालीमध्ये भाडेकरूला कोणतीही कर सवलत मिळत नाही. त्यामध्ये फक्त प्रत्येक टॅक्स स्लॅबवर 50 हजारांचे स्टॅण्डर्ड डिडक्शन (Standard Deduction) देण्यात आले आहे. त्या व्यतिरिक्त कोणतीही सवलत करदात्याला देण्यात आलेली नाही.
मात्र जुन्या कर प्रणालीमध्ये याचा लाभ करदात्याला घेता येणार आहे. इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 10(13A) अंतर्गत, HRA या घटकावर पगारदार व्यक्ती घर भाडे करारावर कर सवलत मिळवू शकतात. त्यासाठी पगारदार व्यक्तीने स्वतःचा HRA किती आहे, हे सॅलरी स्लिपवर तपासणे गरजेचे आहे. जुन्या कर प्रणाली अंतर्गत भाडेकरू या सवलतीचा लाभ घेऊ शकतात.
इतर खर्चाचा समावेश करणे
घर भाडे करार करताना तुम्ही घरामध्ये केलेल्या इतर खर्चाचा समावेश करारात करू शकता. भाड्याच्या घरातील किचनमध्ये बसवलेली चिमणी किंवा वेन्टीलेशनसाठी केलेल्या बदलांसाठी आलेला आर्थिक खर्च देखील भाडे करारात समाविष्ट करता येतो. त्या खर्चावर देखील भाडेकरू कर सवलत घेऊ शकतो.