Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सावधान! मंदी आणि नोकरकपातीमुळे जॉब स्कॅममध्ये वाढ; फसवणूक टाळण्यासाठी 'ही' काळजी घ्या

Job Scam

Image Source : www.pcianalytics.in

बाजारातील मंदी आणि लेऑफचा फायदा फसवणूक करणाऱ्यांकडून घेतला जात आहे. बनावट जॉब पोर्टल तयार करून माहिती घेतली जात आहे. तसेच मुलाखती आणि बनावट ऑफर्स देऊन लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. फ्रिलान्स काम मिळवून देण्याचेही अनेक घोटाळे होत आहेत. या सर्व घोटाळ्यांपासून कसे वाचायचे ते जाणून घ्या.

Job Scam: उद्योग व्यवसायांमध्ये मंदी आणि नोकरकपातीचे सत्र सुरू आहे. अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांसह भारतीय बड्या कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. खर्च कमी करण्यासाठी कंपन्यांकडून कर्मचारी कपात केली जात आहे. तर व्यवसायातील मंदी पाहता नवी नोकरभरती रोखून धरण्यात आली आहे. मात्र, अशा परिस्थितीत घोटाळेबाजांचे चांगलेच फावले आहे. नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक होण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे.

परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याचे फसवणूक

मागील काही दिवसांपूर्वी एका बड्या जॉब पोर्टलची बनावट वेबसाइट तयार करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. (How to find fake Job) बनावट संकेतस्थळाबरोबरच केरळमधील कोची येथे कार्यालयही सुरू केले होते. सर्व काही खरे असल्याचे भासवण्यासाठी त्यांनी अनेकांच्या मुलाखती घेतल्या होत्या.

सिंगापूरमध्ये माहिती तंत्रज्ञान कंपनीत नोकरीची संधी असल्याची जाहिरात केली होती. सुमारे 30 जणांच्या मुलाखतही घेतल्या. या सर्वांकडून विविध शुल्कापोटी 1 ते 3 लाख रुपये घेतले. मात्र, नंतर कार्यालयाला टाळे ठोकून सर्वजण फरार झाले.

बाजारातील मंदी आणि लेऑफचा फायदा फसवणूक करणाऱ्यांकडून घेतला जात आहे. फेशर्स आणि अनुभवी अशा दोघांचीही फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. रिक्रूटमेंट कंपनीचा प्रतिनिधी बोलत असल्याचे भासवून संवाद साधला जातो. त्यामुळे विश्वासहर्ता निर्माण होते. मात्र, समोरची व्यक्ती जॉब पोर्टलची प्रतिनिधी नसतेच. नोकरीच्या बदल्यात विविध प्रकारे शुल्क आणि पैसे उकळण्याचा व्यवसाय काहींनी थाटला आहे.

फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

नोकरी देताना जॉब पोर्टल प्रतिनिधीने किंवा एजन्सीने पैशांची मागणी केल्यास सावध व्हा. (How to find job Fraud) कोणताही कंपनी नोकरी देताना पैसे मागत नाही. अधिकृत एजन्सी पैसे मागत नाही. त्यामुळे जर कोणी पैसे मागत असेल तर देऊ नका.

जॉब पोर्टलच्या विश्वासहर्तेबद्दल चौकशी करा. अनेक वेळा बनावट वेबसाइटची लिंक पाठवून नोंदणी करण्यास सांगितले जाते. यावेळी संवेदनशील माहितीची चोरी होऊ शकते. त्यामुळे संकेतस्थळाची खात्री केल्याशिवाय कोणताही फॉर्म भरू नका किंवा तोंडी माहिती देऊ नका. सरकारी नोकरीची जाहिरात असेल तर अधिकृत सरकारी संकेतस्थळावर जाऊन जाहिरातीची खात्री करा. 

बनावट मुलाखती तसेच बनावट ऑफर लेटर घोटाळेबाजांकडून पाठवली जातात. ऑफर लेटर नीट बारकाइने पाहिल्यास ओळखता येतात. शब्दांची रचना, स्पेलिंग, व्याकरणातील चुका कंपनीचे नाव लिहण्याची पद्धत, फॉरमॅट बारकाइने पाहिल्यास तुम्हाला लक्षात येईल.

व्हॉट्सअपद्वारे फ्रिलान्स काम किंवा नोकरीचे मेसेज किंवा कॉल आले तर उचलू नका. (Job scam) त्यांच्या मेसेजेसला रिप्लाय न देता ब्लॉक करा किंवा सायबर पोलिसांकडे तक्रार द्या. तुमची खासगी माहिती देऊ नका.

व्हॉट्सअपद्वारे सुरुवातीला काही रुपयांचे फ्रिलान्स काम घोटाळेबाज देतात. मात्र, नंतर तुमचे अकाउंट साफ होऊ शकते. किंवा केलेल्या कामाचे पैसे मिळणार नाही. फक्त विश्वास बसण्यासाठी रक्कम देतात.

जॉबसाठी फोन आल्यास जास्तीत जास्त प्रश्न विचारा. जर समोरचा फसवणूक करणारा असेल तर त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत. यातून तुम्हाला सत्य काय आहे ते कळून जाईल.