Jio Book Launch: रिलायन्स कंपनी ज्या क्षेत्रात एंट्री करते त्या क्षेत्रात धुमाकूळ घालते, असं बोललं जातं. 4G इंटरनेट सेवा लाँचवेळी सर्वांनी याचा अनुभव घेतला. आता जिओ लॅपटॉप, टॅबलेट निर्मितीमध्ये उतरली आहे. आज JioBook लाँच होणार आहे. मात्र, हे लॅपटॉप नक्की कोणासाठी आहेत? याबद्दल जाणून घेऊया.
जिओबुक लॅपटॉपच्या विविध मॉडेलच्या किंमती 25 हजारांच्या आत आहेत. सहाजिक एक गोष्ट यातून दिसते, ती म्हणजे रिटेल आणि शाळा-कॉलेजचे विद्यार्थी जिओचे ग्राहक असतील. विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल लर्निंग जशी वाढत आहे, तसे लॅपटॉप, टॅबलेटचे मार्केटही वाढेल, ही संधी ओळखून जिओ बाजारात उतरल्याचे दिसते.
जिओ बुक विद्यार्थ्यांना फायद्याचा ठरेल का?
Jio Book 11 लॅपटॉपची किंमत 16 हजार 500 रुपये आहे. तर एचपी, डेल, एसर या कंपन्यांचे विद्यार्थ्यांसाठीचे म्हणजेच स्टुंडट सिरिजचे लॅपटॉप 28 ते 30 हजार रुपयांपासून पुढे मिळतात. म्हणजेच जिओ चा हा लॅपटॉप 10-12 हजार रुपयांनी स्वस्त आहे. सुरुवातीला मार्केटिंग होण्यासाठी ही किंमती कमी ठेवली असावी.
जिओ बुक लॅपटॉप थोडा वेगळा आहे. यात जिओने स्वत:साठी विकसित केलेली ऑपरेटिंग सिस्टिम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच 4 जीबी रॅम आणि मिडियाटेक कंपनीचा प्रोसेसर या लॅपटॉपला देण्यात आला आहे. 64 GB हार्ड डिस्क आणि इतर काही आकर्षक फिचर्स आहेत.
जिओच्या फिचर्सवरुन हा लॅपटॉप कसा चालू शकतो, याबाबत महामनीने गो-टेक सोल्युशनचे मालक गोविंद आम्ले यांच्याशी चर्चा केली. त्यांना लॅपटॉप सेल्स, सर्व्हिस आणि कन्सल्टिंगमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.
गोविंद आम्ले यांच्या म्हणण्यानुसार, जिओ बुक लॅपटॉप हा विद्यार्थ्यांना वापरता येईल. मात्र, त्यावरती एक्सल, वर्ड, पीपीटी प्रेझेंटेशनसह इतर सर्वसामान्य कमी क्षमतेची कामे करता येतील. कारण 4 जीबी रॅमवरती जास्त प्रोसेसिंग, मेमरी लागणारी कामे जसे की, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझाइनिंग करता येण्याची शक्यता कमी आहे.
तसेच मिडियाटेक प्रोसेसर कसा काम करतो हे सुद्धा पहावे लागेल. कारण, इंटेल ही कंपनी प्रोसेसरमध्ये लिडर आहे. त्याची बरोबरी अद्याप इतर प्रोसेर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना करता आली नाही. भविष्यात जिओने इंटेल, मायक्रोसॉफ्टसोबत मिळून काम केले तर उत्पादनाची कार्यक्षमता वाढवता येईल. तसेच कॉर्पोरेट, बिझनेस ग्राहकांची गरज या लॅपटॉपमधून पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे गोविंद आम्ले यांनी म्हटले.
मार्केटिंग आणि कमी किंमतीची रणनीती
आघाडीच्या डेल, एचपी, एसर कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी जिओकडून सुरुवातील लॅपटॉप आणि टॅबलेटच्या किंमती कमी ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. बाजारात शिरकाव केल्यानंतर तसेच ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यानंतर जिओ दरवाढ करू शकतो. मात्र, हे काम जिओसाठी सोपे असणार नाही. ऑक्टोबर 2022 मध्येही जिओबुकचे काही मॉडेल्स बाजारात आले होते. मात्र, त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही.