अभिनेता शाहरुख खान याची प्रमुख भूमिका असलेल्या जवान या बॉलिवुड सिनेमाने 1100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. बॉक्स ऑफिसवर 1100 कोटींची कमाई करणारा जवान हा पहिला हिंदी सिनेमा ठरला आहे.
जवान सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी रिलीज झाला होता. एकाचवेळी हिंदी, तामिळ आणि तेलगु या भाषांमध्ये जवान एकाचवेळी प्रदर्शित झाला होता. या तिन्ही भाषांमधून सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या 19 दिवसांत जवानने 1000 कोटींचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. यापूर्वी 1000 कोटींची कमाई करण्याचा पराक्रम केवळ चार बॉलिवुड सिनेमांना करता आला आहे.
बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींची कमाई करणारा शाहरुख खानचा हा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी पठाण सिनेमाने जगभरातून 1000 कोटींहून अधिक कमाई केली होती. जानेवारी 2023 मध्ये शाहरुख खानच्या पठाण सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. पठाण सिनेमाने एकूण 1055 कोटींचे उत्पन्न कमावले होते.
जवानची निर्माता कंपनी रेड चिलीज एंटरटेंमेंटने जवान सिनेमाच्या जगभरातील कमाईचा तपशील नुकताच एक्स या सोशल मीडिया हॅंडलवर सादर केला. त्यानुसार भारतातून जवान सिनेमाने 733.37 कोटींची कमाई केली आहे. परदेशातून जवान सिनेमाला 369.90 कोटींचे उत्पन्न मिळाले.
बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवुडला देखील जवानच्या निमित्ताने तिकिट खिडकीवर दीर्घकाळ चालणारा सिनेमा अनुभवता आला आहे. हिंदी भाषिक प्रांतांमध्ये जवानने तब्बल 560.03 कोटींची कमाई केली आहे. याशिवाय इतर भाषांमध्ये डबमधून 59.89 कोटींची कमाई केली आहे.
बॉलिवुड सिनेमे ज्यांनी 1000 कोटींची कमाई केली
- सिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बाहुबली-2 हा 1000 कोटींची कमाई करणारा पहिला हिंदी सिनेमा होता.
- दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या बाहुबली 2 ने 2017 मध्ये भारतासह जगभरातील थिएटरमधून 1788 कोटींची कमाई केली होती.
- यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी पुरस्कार मिळालेला आरआरआर हा सिनेमा देखील 1000 कोटींच्या क्लबमध्ये आहे.
- आरआरआर सिनेमाने 1230 कोटींची कमाई केली होती. के.जी.एफ 2 या सिनेमाने 1215 कोटींची कमाई केली.
- वर्ष 2016 मध्ये रिलीज झालेला अभिनेता आमिर खान याचा दंगल सिनेमा हा आजवरचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा आहे.
- दंगलने तब्बल 2070 कोटींची कमाई केली. यात एकट्या चीनमधून सिनेमाने 1300 कोटींची कमाई केली. हा एक रेकॉर्ड आहे.