जपानमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. शनिवारी जपानमध्ये एकाच दिवसात 463 व्यक्तींचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला. कोरोनाचा नवा व्हेरियंट चीनमध्ये थैमान घालत असून शेजारी देशांमध्येही त्याचा प्रसार सुरू झाला आहे. जपानमध्ये कोरोनाचे दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या टोकिया शहरात 19 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असली तरी नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
जगभरामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. चीनमध्ये अनेक भागात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. अनेक युरोपीयन देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. कोरोना संसर्गातून जग सावरत असताना पुन्हा कोरोना प्रादुर्भावाची भीती निर्माण झाली आहे. जगभरात आधीच मंदी आणि महागाई उच्चांकीवर पोहचली आहे. जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर विविध क्षेत्रांना त्याचा मोठा फटका बसेल
जर्मनीने नागरिकांना आवश्यक नसेल तर चीनमध्ये प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असून त्यामुळे नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो, असे जर्मनीच्या आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे. चीनमधून येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्याचा नियम नेदरलँड देशाने केला आहे. पोर्तुगाल देशानेही कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे.
भारतातील स्थिती काय?
भारताला चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणूच्या व्हेरियंटचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, अद्याप परिस्थिती नियंत्रणात आहे. आज शनिवारी भारतात कोरोनाचे 214 नवे रुग्ण आढळून आले. एकूण कोविड अॅक्टिव्ह केसेस अडीचहजारापर्यंत पोहचल्या आहेत. यातील अनेक रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्यानुसार विमानतळावर रँडम कोरोना चाचणी करण्यात येत आहे. तसेच सरकारी यंत्रणांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.