नोकरदार आणि करदात्यांसाठी आयकर विभागाने वेबसाईटवर कर विवरण सादर करण्यासाठीचा आयटीआर फॉर्म 1 आणि आयटीआर फॉर्म 4 उपलब्ध केला आहे. या दोन्ही फॉर्ममध्ये संपूर्ण तपशील असल्याने करदात्यांना विवरण पत्र सादर करणे सोपे जाणार आहे.
यापूर्वी आयकर विभागाने 25 एप्रिल 2023 रोजी आयटीआरची एक्सलशीट उपलब्ध केली होती. आता त्यासंबधीचे फॉर्म्स देखील आयकर विभागाच्या वेबसाईटवर करदात्यांना वापरता येणार आहेत.
ITR-1 आणि ITR-4 या दोन्ही फॉर्म्समध्ये तपशील आधीपासूनच भरलेला आहे. त्यात फॉर्म-16 मधील नोकरीतून मिळणारे उत्पन्न, बचत किंवा मुदती ठेवींतील व्याजातून मिळणारे उत्पन्न याचा तपशील देण्यात आला आहे.
आयकर विभागाने करदात्यांना आयटीआर फायलिंग करता यावी यासाठी ITR-1, ITR-2 आणि ITR-4 उपलब्ध केले आहेत. कर सल्लागारांच्या मते जूनच्या पहिल्या आठवड्यात ITR फायलिंगची ऑनलाईन प्रक्रिया सुरु होणार आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने फेब्रुवारी 2023 या महिन्यात ITR फॉर्म्सची घोषणा केली होती. आर्थिक वर्ष 2022-23 चे कर विवरण सादर करताना या फॉर्म्सचा वापर करावा लागणार आहे. वैयक्तिक करदाते आणि ज्यांना ऑडिटची आवश्यकता नाही अशा करदात्यांसाठी आर्थिक वर्ष 2022-23 मधील उत्पन्नावर येत्या 31 जुलै 2023 पर्यंत आयकर रिटर्न भरता येणार आहे.
वेबसाईटवरील आयटीआर फॉर्ममुळे वैयक्तिक करदात्यांना आयकर विवरण सादर करणे सोपे जाणार आहे. त्यांना अॅन्युएल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटनुसार आणि फॉर्म 26A नुसार आपले उत्पन्न आणि माहितीची शहनिशा करता येणार आहे. आयकर विभागाकडे तुमचा जी माहिती उपलब्ध आहे तिची खातरजमा करता येणार आहे.
वैयक्तिक करदाते ज्यांचे वार्षिक उत्पन्न 50 लाखांपेक्षा कमी आहे अशांसाठी ITR-1 हा फॉर्म वापता येईल. इतर वैयक्तिक करदाते जे पगारदार आहेत किंवा प्रोफेशनल आहेत किंवा व्यवसायातून ज्यांना उत्पन्न मिळते, अशांसाठी ITR-4 हा फॉर्म वापरता येईल.
ITR ची डेडलाईन चुकली तर दंड भरावा लागणार
विहीत मुदतीत आयकर रिटर्न सादर केला नाही तर करदात्याला आयकर सेक्शन 234 F नुसार 5000 रुपयांची दंडात्मक रक्कम भरावी लागणार आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे अशांना 1000 रुपयांचे दंड सोसावा लागेल.
आयकर विवरण वेळेत सादर न करणाऱ्या करदात्यांना आयकर सेक्शन 234 A नुसार न भरलेले कर रकमेवर दर महिन्याला 1% व्याज भरावे लागणार आहे.