नोकरदार आणि वैयक्तिक करदात्यांची आयकर विवरणपत्र सादर करण्याची लगबग सुरु झाली आहे. करदात्याने विमा, म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली, मुलांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च, नोंदणीकृत संस्थांना देणगी दिल्यास आयकर सवलत मिळते. मात्र ही सवलत मिळवण्यासाठी रितसर पुरावे सादर करावे लागतात. शेवटच्या क्षणी आयकर सवलतीपासून मुकावे लागू नये यासाठी आतापासून सेक्शन 80 C आणि सेक्शन 80 D नुसार केलेल्या गुंतवणुकीचा तपशील आणि प्रीमियम सर्टिफिकेट गोळा करुन ठेवणे आवश्यक आहे.
Table of contents [Show]
होम लोन स्टेटमेंट
होम लोन स्टेटमेंटमुळे करदात्याला वर्षाला आयकर सेक्शन 80 C अंतर्गत कर्जाची मुद्दल म्हणून 1.5 लाख रुपयांची कर वजावट मिळते. त्याशिवाय जर त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हीच राहत असाल तर कर्जाचे व्याज म्हणून वर्षाकाठी 2 लाख रुपयांची कर वजावट मिळते.प्रॉपर्टीची विक्री केली आणि त्यातून आर्थिक नुकसान झाले तर वर्षाला 20000 रुपय क्लेम करु शकता. पुढील 7 वर्ष तुम्ही लॉस क्लेम करु शकता. कर्जावरील व्याजासदर्भात आयकर सेक्शन 80EE आणि आयकर सेक्शन 80 EEA मधून करदात्याला अतिरिक्त करलाभ मिळतो. मात्र ज्या बँकेतून कर्ज काढले आहे त्या बँकेचे होम लोन स्टेटमेंट सादर करणे आवश्यक आहे.
पीपीएफ, आयुर्विम्यासाठी गुंतवणूक
भविष्य निर्वाह निधी आणि आयुर्विमा पॉलिसीसाठी गुंतवणूक केली असेल तर त्याच्या पावत्या कर वजावटीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत. कर वजावटीचा लाभ घेण्यासाठी हे दोन्ही पर्याय लोकप्रिय आहेत. करदात्याला एका वर्षात आयकर सेक्शन 80C नुसार 1.5 लाखांची कर वजावट मिळते.यासाठी पीपीएफ आणि आयुर्विमा रिसिप्ट सादर करणे आवश्यक आहे.
एनपीएसमधील गुंतवणूक
नॅशनल पेन्शन सिस्टममधील गुंतवणुकीवर कमाल 1.5 लाख रुपयांची कर वजावट मिळते. याशिवाय आयकर सेक्शन 80 CCD (1B) मध्ये 50000 रुपयांचा करलाभ मिळतो. एनपीएसमध्ये गुंतवणूक केल्याचे स्टेटमेंट तुम्हाल सादर करावे लागते.
मुलांची ट्युशन फी
आयकर सेक्शन 80C मध्ये करदात्याला मुलांच्या फीसाठी खर्च केला असल्यास त्यावर कर वजावट मिळते. मात्र फी भरल्याच्या पावत्या सादर कराव्या लागतात.
मेडिकल इन्शुरन्स
आयकर सेक्शन 80D अंतर्गत आरोग्य विमा प्रीमियम भरला असेल त्यावर सर्वसाधारण व्यक्तीसाठी 25000 रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 50000 रुपयांची कर वजावट मिळते. मेडिकल इन्शुरन्सची कर वजावट प्राप्त करण्यासाठी विमा प्रीमियमची रिसिप्ट दाखवणे आवश्यक आहे.
डोनेशन रिसिप्ट्स
नोंदणीकृत संस्थांना देणगी दिली असल्यास त्यावर आयकर सेक्शन 80G अंतर्गत 50% ते 100% कर वजावट मिळते. आर्थिक वर्ष 2017-18 नुसार 2000 रुपयांवरील देणगी चेकने करणे बंधन कारक करण्यात आले आहे.
शैक्षणिक कर्ज
आयकर सेक्शन 80E नुसार तुम्ही मुलांसाठी किंवा तुमच्या जोडीदारासाठी शैक्षणिक कर्ज काढले असेल. तर त्यासाठी भरलेल्या व्याजाची रक्कम कर सवलत म्हणून मिळते.