आयटीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारच्या (दि. 4 जुलै) पहिल्या सत्रात हा शेअर 3 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. बीएसईवर (Bombay Stock Exchange) तो 2 टक्क्यांहून अधिक वाढून 290 रुपयांवर (ITC Share Price BSE) पोहोचला होता. गुरूवारी (दि.7 जुलै) दिवसअखेर तो 291.95 अंकावर (ITC Share Price Today) बंद झाला. हा त्याचा 2019 नंतरचा उच्चांक मानला जातो. 2022 मध्ये आयटीसी शेअरमध्ये आतापर्यंत 30 टक्क्यांची वाढ झाली आहे.
फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (FMCG) कॅटेगरीतील हा शेअर मे 2019 पासून त्याच्या सर्वोच्च स्तरावर ट्रेड करत होता आणि गेल्या दोन दिवसांत आयटीसीच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांची वाढ झाली. जानेवारी ते मार्च 2022 या तिमाहीत आयटीसीने चांगली कामगिरी नोंदवली होती. यात प्रामुख्याने सिगारेटच्या उत्पादन विक्रीत सुमारे 9 टक्क्यांनी वाढ झाली होती. कंपनीचा पोर्टफोलिओ मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजनांद्वारे सिगारेटच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद मिळाल्याने सिगारेटच्या उत्पादन आणि विक्रीत चांगली वाढ झाली.
गुंतवणूकदारांनी काय करावे?
शेअर मार्केट तज्ज्ञांच्या मते, सिगारेट व्यवसायाला चांगली स्थिती निर्माण झाली असून या दिवसांत त्याची चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे रिसर्च हेड, गौतम दुग्गड यांच्या मते, 80 टक्क्यांपेक्षा जास्त नफा सिगारेटमधून होतो आणि हा शेअर कमॉडिटीज कॉस्ट इन्फ्लेशनल सर्व्हिसेसच्या तुलनेने सुरक्षित आहे. त्यामुळे मार्केटमधील अभ्यासकांच्या मते या शेअरमधील गुंतवणूक चांगला परतावा मिळवून देऊ शकते. प्रभुदास लीलाधरमधील विश्लेषकांनी एफएमसीजीमध्ये नजीकच्या काळात आयटीसीला दोन अंकी नफ्याची वाढ टिकवून ठेवता येईल, असे म्हटले आहे.