आरोग्य विषयक समस्यांमुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या खर्चाची तरतूद म्हणून आरोग्य विमा संरक्षण घेणे फायद्याचे ठरते. कोरोना नंतर अनेकांनी आरोग्य विमा खरेदीला प्राधान्य दिले आहे. विमा कंपन्यांकडूनही आरोग्य विम्याशी संबंधित विविध योजना आणल्या जात आहेत. तसेच विमा कंपन्यांकडून कॅशलेस सुविधा (cashless medical claims) देणाऱ्या हॉस्पिटलच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत आहे. मात्र, अनेकदा विमा कंपन्यांना प्राप्त झालेले क्लेम हे 100% कॅशलेस केले जात नाहीत. विमा धारकांनाही काही अंशी रक्कम भरण्याची वेळ येते. त्यामुळेच विमा पॉलिसी धारकांना 100% कॅशलेस सुविधा मिळावी यासाठी IRDAI कडून प्रयत्न केले जात आहेत.
कॅशलेससाठी विमा कंपन्यासोबत काम सुरू
आरोग्य विमा घेतल्यानंतर विमा कंपन्याकडून कॅशलेस उपचाराची सुविधा दिली जाते. मात्र, कित्येकवेळा आरोग्य विमा असूनही विमा पॉलिसीधारकांना हॉस्पिटलमध्ये 10 ते 20% पर्यंत रक्कम भरावी लागते. त्यामुळे विमा कंपन्यांकडून देण्यात येणारी कॅशलेस सुविधा म्हणावी तितकी प्रभावी ठरताना दिसत नाही. मात्र, आरोग्य विमा घेणाऱ्या ग्राहकांना एक रुपयाही न भरता संपूर्ण उपचार कॅशलेस उपलब्ध व्हावेत, यासाठी आता भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) आरोग्य विमा कंपन्यासोबत मिळून काम करत आहेत. IRDAI चे अध्यक्ष देवाशिष पांडा यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF)मध्ये याची माहिती दिली.
विमा क्षेत्रातील वेगवेगळ्या संस्थांशी समन्वय-
पांडा म्हणाले की, आरोग्य विमा पॉलिसीधारकांचे दावे 100% रक्कमेसह पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतच आहोत. तसेच कॅशलेस विमा सुविधा देण्यासाठी काहीवेळा रुग्णालयांकडून आडकाठी आणण्याचा प्रयत्न होतो. रुग्णालये कॅशलेस क्लेम असेल तर रुग्णास भरती करून घेण्यासाठी टाळाटाळ करतो. यामागे कॅशलेस सेंटलमेंट होण्यास लागणारा वेळ, 100% कॅशलेस क्लेम मंजुर न होणे अशा काही कारणांचाही समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात IRDAI आरोग्य विमा कंपन्यांसह राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण तसेच भारतीय विमा महामंडळासोबत काम करून 100 टक्के क्लेम मंजूर होण्याच्या दृष्टाने काम करत आहे.
सर्वांसाठी विमा योजना-
2047 देशाच्या स्वातंत्र्य शताब्दी निमित्त देशातील सर्व नागरिकांना विमा मिळावा यासाठी देखील एक मोहीम हाती घेण्यात आल्याचे पांडा यांनी वक्तव्य केले होते. दरम्यान, विमा नियामक प्राधिकरणाकडून विमा पॉलिसीधारकांना जास्तीत दास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांना स्वस्तात आरोग्य विमा उपलब्ध व्हावा यासाठी देखील IRDAI कडून प्रयत्न सुरू आहेत.