Insurance Advertisement: विमा कंपन्यांद्वारे अनेक आकर्षक योजना ग्राहकांसाठी बाजारात आणल्या जातात. आपल्याच कंपनीच्या विमा पॉलिसीमध्ये ग्राहकांनी सर्वाधिक गुंतवणूक करावी, यासाठी स्पर्धा सुरू असते. जाहिरातींमधून योजनेचे फायदे सांगितले जातात. मात्र, या जाहिरातबाजीतून ग्राहकांची दिशाभूलही होते.
जाहिरातींमधून ग्राहकांची दिशाभूल
जाहिरातीमधून खोटे दावे केले जातात. जास्त परतावा आणि योजनेच्या फायद्यांना भुलून ग्राहक गुंतवणूक देखील करतात. मात्र, आता या प्रकारांना आळा घालण्यासाठी इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटीने (Irdai) जाहिरातींची नियमावली कठोर करण्याची शिफारस केली आहे. (Misleading advertisements) कंपन्यांना या नव्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. तसेच ग्राहकांनीही कोणतीही विमा पॉलिसी खरेदी करताना जागरुक असायला हवे. अन्यथा चुकीच्या योजनेत गुंतवणूक करून फसवणूक होऊ शकते.
इर्डाने 2021 साली इन्शुरन्स अॅडव्हरटाइजमेंट आणि डिस्क्लोजर नियमावली आणली होती. त्यात बदल करण्याची शिफारस केली आहे. योजनांच्या प्रचारासाठी ज्या काही जाहिराती तयार केल्या जातात त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची असेल, असे इर्डाने म्हटले आहे.
नव्या शिफारसीनुसार काय बदल होणार?
विमा कंपन्यांना जाहिरात समितीची स्थापना करावी लागणार. या समितीत किमान तीन सदस्य असावेत. त्यांनी मार्केटिंग, योजनेबाबतची आकडेवारी आणि कायद्यांचे पालन होत आहे की नाही यावर लक्ष ठेवावे
वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जाहिरातींची जबाबदारी
नव्याने शिफारस केलेले बदल विमा कंपन्यांपुढे चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहेत. विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पॉलिसी तयार करताना जास्त जबाबदारी असावी, असे इर्डाने म्हटले आहे. समितीच्या हाताखालून जाहिरात गेल्यानंतरच ती ग्राहकांपर्यंत जावी. या समितीने तयार केलेला रिपोर्ट तपासण्यासाठी प्रॉडक्ट मॅनेजमेंट कमिटी तयार करावी. जाहिरातीमध्ये काही बदल सुचवायचे किंवा जाहिरात रद्द करण्याचा अंतिम निर्णय प्रॉडक्ट मॅनेजमेंट समितीचा असेल, असे इर्डाने म्हटले आहे.
जाहिरात कमिटी आणि प्रॉडक्ट मॅनेजमेंट कमिटी या दोन समित्या प्रसारित होणाऱ्या जाहिरातींसाठी जबाबदार असतील, असे इर्डाने म्हटले आहे. तसेच प्रसारित झालेल्या सर्व जाहिरातींचे रेकॉर्ड या समितीकडे असेल. एखादी जाहिरात प्रसारित करण्याचे बंद केल्यानंतरही तीन वर्ष ठेवावी. इर्डा मागेल तेव्हा या जाहिराती मिळण्याची व्यवस्था कंपन्यांनी करावी, असे इर्डाने म्हटले आहे.
जाहिरात प्रसारित झाल्यानंतर तीन दिवसांतच कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड करावी. तसेच एखादी जाहिरात ही त्या योजनेचाच भाग समजण्यात येईल, असे इर्डाने म्हटले आहे.