मान्सून संपूर्ण भारत व्यापल्यानंतर उत्तर भारतात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने हाहाकार उडाला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) ने सर्व जीवन विमा कंपन्या आणि आरोग्य विमा कंपन्यांना उत्तर भारतातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे दावे (Insurance Claim) त्वरित निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत.
आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा
गेल्या आठवडाभरा पासून उत्तर भारतातील अनेक राज्यामध्ये महापुरापुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर विमा नियामक प्राधिकरणाने या पूरग्रस्त भागातून जेवढे विमा क्लेम दाखल होतील त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी विमा कंपन्यांना ताबडतोब मुख्य सचिव किंवा प्रत्येक प्रभावित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संबंधित अधिकाऱ्याला दाव्यांच्या निकालासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचेही सुचित करण्यात आले आहे.
निर्धारित वेळेत दावे पूर्ण करा
विमा कंपन्यांच्या जिल्हा स्तरीय प्रमुख अधिकाऱ्याने दाखल होणाऱ्या सर्व दाव्यांची तात्काळ पाहणी केली जाईल आणि दाव्याची देयके/ खात्यावरील देयके लवकरात लवकर वितरीत केली जातील. तसेच कोणत्याही परिस्थितीत निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ लागणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे, अशा सुचनाही प्राधिकरणाकडून काढलेल्या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.
24x7 हेल्पलाईन सेवा
सर्व विमा कंपन्यांनी विमा धारकांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच विमा क्लेम करण्याविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी 24x7 हेल्पलाईन सेवा सक्रिय करावी. तसेच याबाबत प्रसार माध्यमांच्या सहाय्याने जनतेपर्यंत माहिती पोहोचवावी असेही निर्देशित करण्यात आले आहे. IRDA ने म्हटले आहे की पॉलिसीधारकांना संपर्कासाठी शक्य तेवढ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे. ज्या माध्यमातून कोणत्याही विमा धारकास विमा दाखल करण्यास आणि तो मंजूर करण्यास कोणताही अडथळा येणार नाही.