Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IPO मार्केट थंड; कंपन्या अन् गुंतवणूकदारांच्या मानगुटीवरील भूत काही उतरेना!

IPO August 2022

भारतातील सर्वात मोठा आयपीओ ठरलेल्या LICच्या पब्लिक इश्यूनंतर प्रायमरी मार्केट थंडावले आहे. शेअर मार्केटमधील पडझड, महागाईचे सावट आणि रशिया-युक्रेनचे चिघळलेले युद्ध यामुळे भांडवल उभारणीस इच्छुक असलेल्या कंपन्यांनी तूर्त IPO प्लॅन्सबाबत वेट अॅंड वॉचची भूमिका घेतली आहे.

आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC IPO) आयपीओनं प्राथमिक बाजारात धडक दिली होती. LIC हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ (IPO) ठरला मात्र गुंतवणूकदारांसाठी एक वाईट स्वप्न होते. LIC नंतर तीन महिने IPO बाजार जवळपास ठप्प आहे. शेअर मार्केटमधील पडझड, परदेशी गुंतवणूकदारांची चौफेर विक्री, केंद्रीय बँकांची व्याजदर वाढ, महागाईचा भडका, रशिया-युक्रेनचे चिघळलेले युद्ध आणि गुंतवणूकदारांचा डळमळीत झालेला आत्मविश्वास अशी एक ना अनेक कारणे यामागे आहेत.

2022 च्या पहिल्या सहामाहीत बड्या कंपन्यांचे पब्लिक इश्यू बाजारात धडकले होते. जानेवारी ते जून या काळात जवळपास 50 कंपन्यांचे शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाले होते. त्यापैकी 24 शेअर IPO प्राईसच्या तुलनेत वरच्या पातळीवर ट्रेड करत  आहेत. 26 शेअर्सनी मात्र गुंतवणूकदारांना सपशेल निराश केले. या शेअरची सध्याची किंमत ही त्यांच्या IPO प्राईसच्या तुलनेत कमी आहे. यात अगदी 'एलआयसी'पासून AGS Transact, रेनबो चिल्ड्रेन मेडिकेअर, प्रुडेंट कॉर्पोरेट, डेल्हीव्हरी आणि इथॉस हे शेअर IPO प्राईसच्या तुलनेत 55% कमी किंमतीवर ट्रेड करत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना जबर आर्थिक नुकसान सोसावं लागलं.

शेअर मार्केटमध्ये जून आणि जुलै महिन्यात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. अमेरिकी सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यानंतर भारतीय शेअर मार्केटमधून परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला. महागाईबाबत चिंता व्यक्त करत रिझर्व्ह बँकेनं देखील दोनदा रेपो दर वाढवला. त्यामुळे इंडेक्समध्ये मोठी घसरण झाली. या पडझडीत आयपीओच्या माध्यमातून नव्यानेच मार्केटमध्ये दाखल झालेल्या शेअर्सची पुरती दाणादाण उडाली.

बड्या IPO ने गुंतवणूकदारांना केलं कंगाल

'एलआयसी'च्या आयपीओने गुंतवणूकदारांवर जबर आघात झाला. केंद्र सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळामधील अंशत: म्हणजेच 3.5% हिस्सा विक्री करुन 20,000 कोटींचा निधी उभारला. मात्र गुंतवणूकदारांना मोठं नुकसान सोसावं लागलं. त्याआधी पेटीएम, नायका, कारट्रेड्स, पॉलिसीबझार आणि झोमॅटो या कंपन्यांच्या आयपीओ योजनांनी गुंतवणूकदारांना कंगाल केलं. बड्या कंपन्या कामगिरीत झिरो ठरल्याने गुंतवणूकदार देखील सावध झाले आहेत. त्यामुळे नव्याने पब्लिक इश्यू आणण्यास कोणतीही कंपनी सध्या तयार नाही.

गो एअरलाईन्स, मोबिक्विक, इक्सिगो, फार्माएझी, व्हीएलसीसी हेल्थकेअर, ड्रुम टेक्नॉलॉजी, स्वीगी, Byju's या कंपन्यांनी सेबीकडे IPO साठी परवानगी मागितली आहे, मात्र शेअर मार्केटमधील अस्थिरतेनं या कंपन्यांची झोप उडाली आहे. मार्केटमधील अस्थिरता निवळली तर काही छोटे IPO इश्यू बाजारात येऊ शकतात, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

शेअर मार्केटमधील मोठ्या पडझडीनंतर अनेक कंपन्या त्यांची मार्केट व्हॅल्यू आणि इश्यू प्राईस ठरवण्याबाबत गोंधळल्या आहेत. शेअर मार्केट जोवर स्थिर होत नाही तोवर या कंपन्या IPO प्लॅन्स घोषीत करणार नाहीत, असेही बोलले जाते. महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून आणखी व्याजदर वाढ केली जाईल. ज्यामुळे शेअर मार्केटला आणखी दणके बसतील. परिणामी नवीन IPO योजना बाजारात येण्याची शक्यता कमी आहे.