अहमदाबादमध्ये रविवारी मुसळधार पाऊस झाल्याने इंडियन प्रिमीयर लिगची मेगा फायनल एक दिवस पुढे ढकलण्यात आली होती. आज सोमवारी 29 मे 2023 रोजी चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन संघात होणार आहे. हा सामना गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून क्रिकेटप्रेमींची उत्कंठा वाढली आहे.
इंडियन प्रिमीयर लीगमधील विजेत्या संघाला 20 कोटींचे घसघशीत बक्षिस मिळणार आहे. अंतिम सामन्यातील उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने या सामन्यावर प्रचंड सट्टा लागण्याची शक्यता आहे.
मागील 15 वर्षात इंडियन प्रिमीयर लीगने क्रिकेट रसिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. वर्षागणिक या टुर्नामेंटची लोकप्रियता कित्येक पटीने वाढत आहे. यंदाची आयपीएलचे जिओ सिनेमावर मोफत प्रसारण करण्यात आले होते. शुक्रवारी 27 मे 2023 रोजी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये झालेला प्लेऑफचा सामना 2.57 कोटी प्रेक्षकांनी पाहिला होता. आयपीएलमध्ये एका सामान्याला मिळालेली ही रेकॉर्डब्रेक व्ह्यूवरशीप ठरली होती.
वर्ष 2008 मध्ये आयपीएलची सुरुवात झाली होती. पहिल्याच वर्षी विजेत्या संघाला 4.8 कोटींचे रोख बक्षिस देण्यात आले होते. उपविजेत्या संघाला 2.4 कोटींचे बक्षिस देण्यात आले होते. मागील 15 वर्षात बक्षिसाची रक्कम प्रचंड वाढली आहे.
आयपीएलचे आयोजन करणाऱ्या बीसीसीआयने येत्या हंगामात आयपीएलमधील बक्षिसाची रक्कम आणखी वाढवण्याचे जाहीर केले आहे. यंदाच्या हंगामात एकूण 46.5 कोटींची बक्षिसे देण्यात येणार आहेत. तिसऱ्या स्थानावरील संघाला 7 कोटी आणि चौथ्या स्थानावरील संघाला 6.5 कोटींचे बक्षिस देण्यात येणार आहे.
आयपीएल अधिक आकर्षक आणि स्पर्धात्मक करण्यासाठी बीसीसीआयने वैयक्तिक खेळाडूंसाठी देखील भरघोस बक्षिसे जाहीर केली आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या ऑरेंज कॅप बॅट्समनला आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पर्पल कॅप बॉलरला प्रत्येकी 15 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.
यंदाच्या टुर्नामेंटमधील इर्मजिंग प्लेअरला 20 लाख रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअरसाठी 12 लाख, पॉवरफुल प्लेअरसाठी 12 लाख, सुपर स्ट्रायकर ऑफ दि सिझन आणि गेम चेंजर ऑफ दि सिझन या पारितोषिकासाठी अनुक्रमे 15 लाख आणि 12 लाखांचे बक्षिस दिले जाणार आहे. याशिवाय प्लेअर ऑफ दि मॅचसाठी प्रत्येकी 1 लाख रुपयांचे कॅश प्राईज देण्यात आले होते. आणखी इतर पाच वेगवेगळ्या पुरस्कारांसाठी खेळाडूंना 1 लाखांचे बक्षिस देण्यात आले.