केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनेत गुंतवणूक मर्यादा वाढवल्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. मे महिन्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या अल्प बचत योजनांमधून तब्बल 24000 कोटींची गुंतवणूक झाली आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मे महिन्यात या गुंतवणुकीत चार पटीने वाढ झाली.
ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनेत (Senior Citizens Savings Scheme) मे 2023 मध्ये 15000 कोटींची गुंतवणूक झाली आहे. याच महिन्यातील एकूण गुंतवणूक 24000 कोटी इतकी आहे. मासिक आधारावर एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात गुंतवणुकीचा ओघ 85% वाढल्याचे दिसून आले आहे.
केंद्र सरकारने 31 मार्च 2023 रोजी अल्प बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली होती. सलग दोन तिमाहींमध्ये अल्प बचतीवरील व्याजदर वाढवल्याने या योजनांमधील गुंतवणुकीचा ओघ वाढला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
1 एप्रिल ते 30 जून 2023 या तिमाहीसाठी सरकारने अल्प बचतीचे व्याजदर वाढवले आहेत. यात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट,किसान विकास पत्र,पोस्टाच्या बचत योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ठेव योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 0.70% ने वाढवण्यात आला आहे. यापूर्वी जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी अल्प बचतीच्या योजनांचा व्याजदर 0.20% ते 1.10% वाढवण्यात आला होता.
पोस्टातील एक वर्ष मुदतीच्या ठेवींचा व्याजदर आता 6.8% इतका वाढला आहे. त्यात 0.20% वाढ झाली.यापूर्वी तो 6.6% इतका झाला आहे. 2 वर्षांच्या ठेवींवर आता गुंतवणूकदारांना 6.9% व्याज मिळणार आहे. 3 वर्षांसाठी ठेवींवरील व्याजाचा दर 7% असेल. 5 वर्षांच्या मुदत ठेवींचा व्याजदर 7.50% इतका वाढवण्यात आला आहे. त्यात थेट 0.5% वाढ करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेच्या व्याजदरात 0.20% वाढण्यात आला. जेष्ठांना आता बचतीमधून 8.20% व्याज मिळणार आहे. हा व्याजदर तिमाही स्तरावर दिला जाईल. पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेचा व्याजदर 1 एप्रिल 2023 पासून 7.4% व्याज मिळणार आहे. यापूर्वी तो 7.1% होता. त्यात 0.30% करण्यात आली.
बजेटमध्ये केली होती मोठी घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची (SCSS) गुंतवणूक मर्यादा वाढवली होती.सिनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीममध्ये (SCSS) गुंतवणुकीची कमाल मर्यादा 15 लाखांवरुन 30 लाख रुपये करण्यात आली होती.त्याचबरोबर जास्तीत जास्त ठेवीची मर्यादा मंथली इन्कम अकाऊंट स्कीमची मर्यादा 4.5 लाखांवरुन 9 लाख रुपये केली होती.याशिवाय जॉईन्ट अकाउंटसाठी गुंतवणुकीची मर्यादा 9 लाखांवरुन 15 लाख रुपये करण्यात आली होती.
सिनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीमची वैशिष्ट्ये काय?
या योजनेसाठी किमान 1,000 रुपयांची ठेवी ठेवता येते.जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवता येतात.यापुढे आता या मर्यादेत वाढ करुन ती 30 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.या योजनेचा मुदतपूर्ती कालावधी 5 वर्षे असणार आहे.ती आणखी 3 वर्षांसाठी वाढवता येणार आहे. गुंतवणूकदाराला खाते बंद करून मुदतपूर्व रक्कम काढायची असेल तर तो खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो.