भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी (LIC) ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणून आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. आपल्यापैकी अनेकांनी एलआयसीच्या अनेक पॉलिसी खरेदी केल्या आहेत. आर्थिक गुंतवणूक करताना मुदत ठेव, पोस्टातील योजना यासोबत लोक एलआयसीच्या पॉलिसीमध्ये देखील गुंतवणूक करतात. जर तुम्ही मुलीच्या नावे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर एलआयसीची जीवन लक्ष्य पॉलिसी (LIC's Jeevan Lakshya policy) हा एक उत्तम पर्याय आहे. या पॉलिसीच्या मदतीने तुम्ही दररोज 120 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवेळी 27 लाख रुपयांचा मोठा फंड तयार करू शकता. या पॉलिसीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसीची वैशिष्ट्ये जाणून घ्या
एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसीमध्ये 18 ते 55 वर्ष वयोगटातील लोक गुंतवणूक करू शकतात. या पॉलिसीची मुदत 13 ते 25 वर्ष इतकी आहे. तर मॅच्युरिटीचे कमाल वय 65 वर्ष निश्चित करण्यात आले आहे.
तुम्ही जितक्या वर्षांसाठी पॉलिसी निवडणार आहात, त्यापेक्षा 3 वर्ष कमी प्रीमियम या पॉलिसीमध्ये भरावा लागणार आहे. म्हणजेच जर तुम्ही 25 वर्षासाठी पॉलिसी खरेदी केली, तर तुम्हाला 22 वर्षाचा प्रीमियम भरावा लागेल.
महत्त्वाचं म्हणजे यात पॉलिसीधारकाला किमान 1 लाख रुपयांची पॉलिसी रक्कम मिळते. तर कमाल पॉलिसीच्या रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. या पॉलिसीचा प्रीमियम तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर भरू शकता.
या पॉलिसीमध्ये डेथ बेनिफिट देखील देण्यात येत आहे. पॉलिसीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर कंपनी पॉलिसी प्रीमियम भरते. मॅच्युरिटीपूर्वी प्रीमियम सुरू असेपर्यंत दरवर्षी पॉलिसी रकमेच्या 10 टक्के रक्कम नॉमिनीला दिली जाते.
27 लाख रुपयांचा फंड कसा मिळेल?
जर तुम्ही एलआयसी जीवन लक्ष पॉलिसी 25 वर्षासाठी खरेदी केली, तर त्याचा प्रीमियम तुम्हाला केवळ 22 वर्षे भरावा लागणार आहे. या पॉलिसीमध्ये तुम्ही दररोज 120 रुपयांची गुंतवणूक केली, तर मासिक 3600 गुंतवले जातील. ही रक्कम 22 वर्ष गुंतवल्यानंतर 3 वर्षाचा यावर वेटिंग पिरियड देण्यात येणार आहे. 25 वर्षानंतर मॅच्युरिटीवेळी 27 लाखांचा मोठा फंड तुम्हाला मिळणार आहे.
22 वर्षात एकूण 264 महिने असतात. या हिशोबाने 22 वर्षात प्रत्येक महिन्याला 3600 रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर एकूण गुंतवणूक 9,50,000 रुपयांची होणार आहे. तर मॅच्युरिटीवेळी गुंतवणूकदारांना 27 लाख रुपये परतावा स्वरूपात मिळणार आहेत. या योजनेत 17.5 लाख रुपयांचा फायदा होणार आहे. ही रक्कम तुम्ही मुलीच्या लग्नासाठी किंवा तिच्या उच्च शिक्षणासाठी वापरू शकता.
Source : timesnowhindi.com