सध्या सुरू असलेल्या इतर अल्प बचत गुंतवणूक योजनांच्या तुलनेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर अधिक आहे. पीएफवरील व्याजदर कपातीचा निर्णय हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या व्यवस्थापन (EPFO) मंडळाने सध्याच्या परिस्थितीनुसार घेतला असून तो योग्य असल्याची भूमिका अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी राज्यसभेमध्ये मांडली.
अर्थमंत्रायल, पीएफ व्याजदरांबाबत अंतिम निर्णय घेणार असून पीएफ व्यवस्थापन मंडळाकडून व्याजदर निश्चित केले जातात. त्यात क्वचितच बदल केले जातात. अल्प बचतीच्या इतर योजनांची तुलना केली असता सध्या पीएफवर चांगले व्याज मिळत आहे. सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के, सिनिअस सिटीझन बचतीवर 7.4 टक्के, पीपीएफवर 7.1 टक्के, तर स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या 5 आणि 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर साधारण 5.50 टक्के व्याज मिळत आहे. या सर्व योजनांच्या तुलनेत ईपीएफओने पीएफवर 8.1 टक्के व्याजदर जाहीर केला आहे. गेल्या 40 वर्षात पीएफवरील व्याजदरात कपात करण्यात आली नव्हती, असा दावा ही सीतारामन यांनी केला.
गेल्यावर्षी पीएफवरील व्याजदर 8.5 टक्के इतका होता. यावर्षी तो कमी करुन 8.1 टक्के करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे. या प्रस्तावाला अर्थ खात्याने मंजुरी दिली तर देशभरातील सुमारे 6 कोटी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक व्याजाचे उत्पन्न कमी होणार आहे.