अकासा एअरलाईन्समधील वैमानिकांच्या बंडाने कंपनीची विमान सेवा विस्कळीत झाली आहे. यातून धडा घेत इतर विमान कंपन्यांनी पायलट्स आणि केबिन क्रूला खूश करण्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजींचा वापर सुरु केला आहे. हवाई क्षेत्रातील सध्याची आघाडीची कंपनी इंडिगोने पायलट्सला किमान 10% वेतन वाढ आणि कामाचे तास निश्चित करण्याची घोषणा केली आहे. येत्या ऑक्टोबरपासून पगारवाढ लागू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी देखील इंडिगोने पायलट्सचे 10% वेतन वाढवले होते.
इंडिगोने पायलट्ससाठी 10% वेतन वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्स या वृतसंस्थेने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार 1 ऑक्टोबर 2023 पासून इंडिगोतील वैमानिकांना वाढीव पगार मिळणार आहे. सर्वच श्रेणीतील वैमानिकांना ही पगारवाढ लागू होणार आहे. याशिवाय दरमहा वैमानिकांना कामकाजाचा वेळ 70 तास इतका निश्चित केला आहे.
पायलट्सचे कामाचे तास निश्चित केल्यामुळे त्यांना महिनाभरात 70 तास पूर्ण करावे लागतील. त्याहून अधिक काम करणाऱ्या वैमानिकांना ओव्हरटाईम अलाउंस लागू होणार आहे. एअर इंडिया आणि अकासा एअरमध्ये पायलट्ससाठी महिन्याला 40 तासांची कामाची वेळ निश्चित केली आहे.
चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीत इंडिगोने चांगली कामगिरी केली आहे. हवाई क्षेत्रात इंडिगोचा 60% हिस्सा आहे. या तिमाहीत कंपनीला 3090 कोटींचा नफा झाला होता. त्यामुळे कंपनीने वैमानिकांना पगार वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शुक्रवारी 29 सप्टेंबर 2023 रोजी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडचा शेअर 2381.20 रुपयांवर स्थिरावला. त्यात 1.66% वाढ झाली होती.
विमान कंपन्यांकडे कुशल मनुष्यबळाची वानवा
- भारतीय विमान कंपन्यांना सध्या कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे.
- अकासा एअर या विमान कंपनीत वैमानिकांनी सामूहिक राजीनामे दिले होते. हे प्रकरण कोर्टात गेले आहे.
- तेथील अनेक पायलट्सनी इतर कंपन्यांमधील नोकरी स्वीकारली आहे.
- पायलट्सला रोखण्यासाठी अकासा एअरकडून दोनवेळा वेतन वाढ करण्यात आली होती. मात्र तरिही वैमानिकांचे राजीनामे सुरुच आहेत.
- एअर इंडियाने देखील एप्रिल महिन्यात कर्मचाऱ्यांना 20% पगार वाढ दिली आहे.
- कुशल मनुष्यबळाची हवाई क्षेत्रात कमतरता जाणवू लागल्याने विमान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची पळवापळवी सुरु केली आहे.
- सुट्ट्यांचा हंगाम तोंडावर असल्याने प्रत्येक विमान कंपनीला सेवा अखंडित सुरु ठेवण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
- पायलट्स सारख्या कर्मचाऱ्याला कायम ठेवण्यासाठी विमान कंपन्यांकडून भरघोस पगार, भत्ते आणि इतर सुविधांची ऑफर दिली जात आहे.