भारतात सेकंड हॅण्ड कार्स (जुन्या मोटारी) खरेदी करण्याचा ट्रेंड लोकप्रिय होत आहे. 2021-22 या वर्षात युज्ड कार मार्केटची उलाढाल 1.8 लाख कोटी रुपये इतकी होती. दरवर्षी ही बाजारपेठ सरासरी 19.5% ने वाढण्याची शक्यता असून कारची संख्या 12.7% ने वाढण्याची शक्यता आहे. 2027 पर्यंत ही बाजारपेठ 8 लाख कोटींपर्यंत वाढेल, असा अंदाज इंडियन ब्लु बुक या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ( IndianBlueBook used car report)
एकीकडे कोरोना संकटामुळे कार मार्केट संकटात सापडले असताना जुन्या मोटारींच्या विक्रीच्या आकड्यांनी सर्वांनाच चकित केले आहे. मध्यम वर्गाच्या उत्पन्नात झालेली वाढ, युवक युवतींची वाढती संख्या याशिवाय अॅप आणि इतर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सोपी झालेली खरेदी याचा फायदा युज्ड कार मार्केटला झाला आहे. थेट नवी घेण्याऐवजी जुनी कार घेण्याकडे ग्राहकांला कल आहे.
महानगरांबरोबरच छोटी शहरे, निमशहरे आणि तालुक्याच्या ठिकाणी युज्ड कार डिलर्सची संख्या वाढत आहे. युज्ड कारची बाजारपेठ हळुहळु संघटित होत आहे. या मार्केटमध्ये मारुती ट्रु व्हॅल्यू आणि महिंद्रा फर्स्ट चॉईस या दोन बड्या कंपन्या आहेत. मारुती आणि महिंद्राचे देशभरात 3000 हून अधिक डिलर नेटवर्क आहे. त्याशिवाय छोटे मोठे डिलर देखील हजारोंच्या संख्येने आहेत. मात्र अजूनही जुन्या मोटारींची 70% ते 80% बाजारपेठ ही असंघटित विक्रेत्यांच्या ताब्यात आहे. गॅरेजमधील मॅकेनिक, छोटे ब्रोकर्स थेट कार मालक आणि ग्राहक यांच्यात भेट घडवून कारची डील करत आहेत. शिवाय ऑनलाईन मार्केटप्लेस देखील एका क्लिकवर ग्राहकांना वेगवेगळ्या शहरातील हजारो मोटारींचा तपशील उपलब्ध करत आहेत. त्यामुळे युज्ड कार खरेदी करणे सोपे झाले आहे.
युज्ड कार मार्केटमध्ये होणारा जुन्या मोटारींचा मोठा पुरवठा हा मुंबई, दिल्ली एनसीआर, हैद्राबाद, बंगळुरु, चेन्नई यासारख्या महानगरांमधून होतो. यात विक्री होणाऱ्या मोटारी या सरासरी चार वर्ष जुन्या किंवा 70,000 किमीपर्यंत अंतर पूर्ण केलेल्या आहेत. मागील सहा वर्षात मोटारींचे सरासरी आयुष्य 33% कमी झाल्याचे दिसून आले आहे. 2021-22 या वर्षात झालेल्या विक्रीमध्ये मोटारीची किंमत सरासरी 4.5 लाख रुपये इतकी होती. 44 लाख मोटारींची विक्री झाल्याचे अहवालात म्हटलं आहे. यातील 15% महिला खरेदीदार होत्या. 2026-27 पर्यंत या मार्केटमधील युज्ड कारची संख्या 80 लाखांपर्यंत वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अमेरिका, चीन, युके, जर्मनी आणि फ्रान्समध्ये जवळपास 8 कोटींहून अधिक मोटारींची विक्री झाली होती.
तातडीने नियमावली करणे आवश्यक
सेकंड हॅण्ड कारच्या विक्रीचा वेग पाहता या बाजाराची प्रचंड वाढ होत आहे. IBB च्या अहवालात युज्ड कार मार्केटसाठी तातडीने नियमावलीची गरज व्यक्त करण्यात आली आहे. येत्या 2025 पर्यंत निमशहरी भागात प्रत्येक चार पैकी तीन कार या युज्ड कार असतील. देशातील ४० मुख्य शहरांमध्ये युज्ड कारचे मार्केट 10% ने वाढेल. या शहरांव्यतिक्त ही बाजारपेठ 30% ने वाढणार आहे.जुन्या मोटारींवर 12% ते 18% वस्तू आणि सेवा कर आकारला जातो. मात्र ही बाजारपेठ अजून असंघटित असल्याने बहुतांश डीलमध्ये जीएसटी भरला जात नाही. यामुळे सरकारचे मोठे नुकसान होत आहे. या बाजारपेठेला तातडीने नियमावली आणि सुस्पष्ट धोरणाची आवश्यकता इंडियन ब्लू बुकने व्यक्त केली आहे. गेल्याच आठवड्यात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात प्रस्तावित आराखडा जाहीर केला होता. युज्ड कार डिलरची नोंदणी करण्यासाठी मोटार वाहन कायद्यात सुधारणा कराव्या लागतील.