भारतात राजकीय क्षेत्रातील पुढाऱ्यांच्या वाढणाऱ्या संपत्तीबद्दल नागरिकांना नेमहीच कुतूहल असते. राजकीय नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेले प्रतिज्ञापत्रातील आकडे पाहिले तर त्यामध्ये बहुतांशवेळा संपत्तीच्या आकडेवारीचा क्रम हा चढताच दिसून येतो. आज आपण भारतामध्ये राज्यसभेचे सर्वात श्रीमंत खासदार (Richest Rajya Sabha MP) कोण आहेत. याबाबतची माहिती जाणून घेऊयात..
27 खासदारांची संपत्ती 100 कोटीपेक्षा जास्त
असोसिएशन फॉर डेमोक्रेसी रिफॉर्म्स (ADR) या संस्थेन प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतातील राज्यसभा सदस्यांपैकी एकूण 27 खासदारांची संपत्ती 100 कोटी पेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील सर्वाधिक खासदार अब्जाधीश आहेत. एडीआर या संस्थेने 225 राज्यसभा खासदारांच्या संपत्तीचे विश्लेषण केले आहे. त्यामध्ये ही आकडेवारी स्पष्ट करण्यात आली आहे. आपण या ठिकाणी TOP-10 श्रीमंत खासदारांची माहिती जाणून घेणार आहोत.
कोण आहेत सर्वात श्रीमंत खासदार?
एडीआरने जाहीर केलेल्या अहवालात भारतातील श्रीमंत 27 राज्यसभा खासदारांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांक हा भारत राष्ट्र समितीच्या खासदाराचा लागतो. बीआरएसचे राज्यसभा सदस्य डॉ.बंदी सारधी हे राज्यसभेतील सर्वात श्रीमंत खासदार आहेत. सारधी यांच्याकडे एकूण 5300 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यानंतर श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आंध्रप्रदेशातील वायआरएस काँग्रेसचे अल्ला अयोध्या रामी रेड्डी हे आहेत. रेड्डी यांच्याकडे सुमारे 2,577 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर समाजवादी पक्षाच्या राज्यसभा सदस्य जया बच्चन या 1001 कोटी रुपयांच्या संपत्तीसह श्रीमंत राज्यसभा खासदारांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
TOP-10 बाकीचे 7 श्रीमंत खासदार पुढील प्रमाणे-
वरील प्रमाणे सर्वाधिक श्रीमंत राज्यसभा खासदारांच्या यादीत पुढील खासदारांचाही समावेश आहे.
- पहिल्या 10 श्रीमंत खासदारांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर काँग्रेसचे राज्यसभा खासदार अभिषेक मनु सिंघवी यांची वर्णी लागते. सिंघवी यांच्याकडे 649 कोटी रुपयांच्या संपत्ती आहे.
- पाचव्या क्रमांकावर अपक्ष राज्यसभा खासदार कपिल सिब्बल हे असून त्यांनी 608 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे.
- सहाव्या क्रमांकावर AAP खासदार विक्रमजीत सिंह साहनी असून त्यांच्याकडे 498 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
- सातव्या क्रमांकावर AAP पक्षाचेचे खासदार संजीव अरोरा आहेत. त्यांच्याकडे 460 कोटी रुपये संपत्ती आहे.
- आठव्या क्रमांकवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे आहेत. पटेल यांच्याकडे 416 कोटींची संपत्ती आहे.
- नवव्या क्रमांकावर आंध्रप्रदेशातील वायआरएसचे सदस्य नथवानी परिमल हे आहेत. त्यांच्याकडे 396 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
- श्रीमंत राज्यसभा खासदारांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर हरियाणाचे कार्तिक शर्मा हे आहेत. त्यांच्याकडे 390 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
सर्वात गरीब राज्यसभा सदस्य कोण?
दरम्यान, एडीआर(ADR) या संस्थेन सर्वात गरीब खासदारांची (Poorest Rajya Sabha MP) माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यसभेतील सर्वात गरीब खासदार हे पंजाबमधील आम आदमी पार्टीचे सदस्य संत बलबीर सिंग हे आहेत. त्यांच्याकडे केवळ 3 लाख रुपयांची संपत्ती आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचे गरीब खासदार म्हणून भाजपचे महाराजा सनजाओबा लेशेम्बा यांचे नाव पुढे येते. त्यांच्या नावावर 5 लाख रुपयांची संपत्ती आहे.यासह तिसरे गरीब खासदार आम आदमी पक्षाचे संजय सिंह असून यांच्याकडे सहा लाख रुपयांची संपत्ती आहे.