आर्थिक वर्ष 2022-23 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसर्या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 4.4 टक्के दराने वाढली आहे. तर गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी 5.4 टक्के होता. तिसऱ्या तिमाहीसाठी जाहीर केलेला जीडीपीचा आकडा चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत कमी आहे. दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था 6.3 टक्के दराने वाढली होती. त्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत आर्थिक वाढीचा वेग मंदावला आहे. चलनवाढ आणि मागणीचा अभाव यामुळे जीडीपीमध्ये ही घसरण झाल्याचे मानले जात आहे.
2022-23 मध्ये जीडीपी 7 टक्के असेल
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (Ministry of Statistics & Programme Implementation) आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आर्थिक विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात जीडीपी 9.1 टक्के होता. तसेच, जीडीपीची आकडेवारी जाहीर करताना मंत्रालयाने सांगितले की, आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत, जीडीपी 40.19 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत 38.51 लाख कोटी रुपये होता. त्याच वेळी, 2022-23 मध्ये नाममात्र जीडीपी 272.04 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे, जो 2021-22 मधील 234.71 लाख कोटी रुपयांपेक्षा 15.9 टक्के जास्त आहे.
सेक्टर्सची स्थिती
- दुसऱ्या तिमाहीत 6 टक्क्यांच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत उर्जा क्षेत्रात 8.2 टक्के वाढ झाली आहे.
- खनन आणि उत्खनन GVA मध्ये Q2 मध्ये 0.4% वरून Q3 मध्ये 3.7% वाढ झाली आहे.
- फायनान्शिअल, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा 6.9% आणि बांधकाम, जे श्रम-केंद्रित क्षेत्र आहे, 8.4% ने वाढले.
- व्यापार, हॉटेल्स, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणात 9.7% वाढ झाली आहे.
- मागील तिमाहीच्या तुलनेत उत्पादन क्षेत्रात 1.1 टक्के घट झाली आहे.
दर आरबीआयच्या अंदाजातच राहिला
डिसेंबरमध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI – Reserve Bank of India) ने 2022 च्या शेवटच्या तिमाहीत 4.4 टक्के विकास दराचा अंदाज वर्तवला होता. मात्र, त्यावेळी मध्यवर्ती बँकेने यंदाचा विकास दर 6.8 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु जानेवारीच्या सुरुवातीला सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केलेल्या जीडीपीच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, भारताचा जीडीपी 2022-23 मध्ये 7 टक्क्यांनी वाढेल. सरकारने 28 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या दुसऱ्या आगाऊ अंदाजामध्ये, या वर्षासाठी भारताचा पूर्ण वर्षाचा GDP विकास दर 7 टक्के राखून ठेवला आहे.