Satellite Communication: कधीकाळी अंतराळ क्षेत्र म्हणजे केवळ विकसित देशांचीच मक्तेदारी आहे असा सर्वसामान्य समज होता. परंतु अलिकडच्या काळात भारताने देखील या क्षेत्रात चांगलाच जम बसवला आहे. अंतराळ क्षेत्रात थेट चीन आणि रशियाला टक्कर देण्यासाठी भारत सज्ज असल्याचे दिसत आहे.
भारत सरकारद्वारे चालविल्या जाणाऱ्या NewSpace India Ltd. कंपनीतर्फे मागील महिन्यात तीन डझन कम्युनिकेशन सॅटेलाइट सोडले गेले. इंग्लंडच्या वनवेब लिमिटेड कंपनीच्या सॅटेलाइट देखील भारतातून सोडल्या गेल्या आहेत. विकसित देश आता अंतराळ क्षेत्रातील मोहिमेसाठी भारताची मदत घेताना दिसत आहेत. येणाऱ्या काळात या क्षेत्रावर भारत जम बसवू शकतो अशी शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.
Indian Army signs ₹3,000 crore agreement with NewSpace India Ltd for Advanced Communication Satellite.
— News Arena India (@NewsArenaIndia) March 29, 2023
They signed contract with BEL for ₹2,400 crore for procurement of Automated Air Defence Control & Reporting System.
एका अहवालानुसार 2025 पर्यंत अंतराळ क्षेत्राशी संबंधित व्यवसाय 600 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल असे म्हटले आहे. 2020 मध्ये या क्षेत्रात 447 अब्ज डॉलरची गुंतवणूक पाहायला मिळाली होती. ट्विटर आणि टेस्लाचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी देखील भविष्याचा विचार करता अंतराळ क्षेत्रात उडी घेतली आहे. स्पेसएक्स (SpaceX) नावाने त्यांनी स्वतःची कंपनी सुरु केली असून रशिया, चायना आणि इतर देशांनाही ते सॅटेलाइट लॉंचिंगसाठी सुविधा पुरवत आहेत.
SpaceX च्या तुलनेत भारताला पसंती
अंतराळ क्षेत्रात स्पेसएक्सचा वाढता दबदबा अनेक देशांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अशा परिस्थितीत भारताने देऊ केलेली अंतराळ सेवा पर्यायाने स्वस्त आणि उत्तम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.अमेरिकेतील नॉर्दन स्काय रिसर्च या अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख सल्लागार डॅलस कासाबोस्की यांनी याबाबत केलेलं विधान समजून घेण्यासारखं आहे. ते म्हणतात की स्पेसएक्स कंपनीने सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठीचा सॅटेलाइट खर्च वाढवला आहे. तसेच त्यांच्याकडे अनेक ग्राहक देखील आहेत. त्यामुळे अनेकांना सॅटेलाइट लॉंचिंगसाठी वाट बघावी लागतेय. अशावेळी काही देश वेगळ्या पर्यायांच्या शोधात असतात. अमेरिकेसारखे देश चीन किंवा राशियाकडे जाऊ शकत नाही. अशावेळी त्यांच्याकडे भारत हा उत्तम पर्याय ठरतो आहे.
चीनबद्दल साशंकता
अंतराळ क्षेत्रात चीनचा वाढता हस्तक्षेप अनेकांची डोकेदुखी ठरत आहे. चिनी बनावटीच्या उपग्रहांच्या गुणवत्तेबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. तसेच चिनी तंत्रज्ञान वापरून संवेदनशील माहिती उघड केली जाण्याचा धोका देखील काही देशांना वाटतो आहे.
अंतराळ क्षेत्रात 'मेक इन इंडिया'!
अंतराळ क्षेत्राचा विकास करणे हा मेक इन इंडिया मोहिमेचा एक महत्वाचा भाग आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेकदा यावर भाष्य केले आहे. अंतराळ क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी त्याविषयी काम करणाऱ्या स्टार्टअप्सला देखील सरकारद्वारे अनुदान दिले जात आहे.
PM Narendra Modi congratulates ISRO, NewSpace India Ltd and IN-SPACe after Indian space agency's heaviest rocket, on its maiden commercial mission, successfully placed 36 broadband communication satellites of UK-based customer into intended orbits
— Press Trust of India (@PTI_News) October 23, 2022
भारताच्या न्युस्पेस कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात 17 अब्ज रुपयांचा महसूल आणि 3 अब्ज रुपयांचा नफा कमावला होता. गेल्या वर्षभरात 52 आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी उपग्रह प्रक्षेपण सेवा न्युस्पेसने प्रदान केली आहे. अंतराळ क्षेत्राच्या स्पर्धेत चीनला पछाडणे भारतासमोर खरे तर मोठे आव्हान आहे. आजघडीला पृथ्वीभोवती फिरणाऱ्या एकूण उपग्रहांपैकी 13.6% उपग्रह चीनद्वारे नियंत्रित केले जातात. भारताचा विचार केला असता ही टक्केवारी 2.3% इतकी आहे. परंतु येणाऱ्या काळात बदलती जागतिक आर्थिक आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेता भारताकडे मोठमोठ्या संधी चालून येऊ शकतात असे जाणकारांचे म्हणणे आहे.