चांद्रयान 3 (Chandrayaan 3) ही चांद्रयान 2चं फॉलो-अप मिशन आहे. चांद्रयान 2 मोहिमेअंतर्गत 22 जुलै 2019 रोजी यान प्रक्षेपित करण्यात आलं होतं. चांद्रयान 2ला चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचण्यासाठी 48 दिवस लागले होते. मात्र 6 सप्टेंबर 2019 रोजी विक्रम लँडर क्रॅश झाल्यानंतर हे मिशन अयशस्वी झालं. आता चांद्रयान 3 ही मोहीम राबवली जाणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) यासंदर्भातली माहिती दिली आहे. चांद्रयान 3 हे 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2.35 वाजता आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केलं जाणार आहे.
Table of contents [Show]
प्रक्षेपणाआधी इसरोनं 5 जुलै रोजी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रात एलव्हीएम 3 (LVM3) प्रक्षेपण वाहनासह चांद्रयान-3 ऑर्बिटरचा पूर्ण आढावा घेतला. चांद्रयान 3 सुमारे 615 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलं आहे. भारताच्या तिसर्या चंद्र मोहिमेचा उद्देश चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर यशस्वीपणे उतरवणं आणि त्यानंतर अनेक प्रयोग करण्यासाठी रोव्हर तैनात करणं हा असणार आहे.
LVM3-M4/Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) July 7, 2023
Vehicle electrical tests completed.
Citizens are invited to witness the launch from the Launch View Gallery at SDSC-SHAR, Sriharikota, by registering at https://t.co/J9jd8ylRcC
काय संशोधन करणार चांद्रयान?
चंद्राचे थर्मोफिजिकल गुणधर्म, भूकंप, प्लाझ्माचं प्रमाण आणि चंद्राच्या पृष्ठभागावर उपस्थित असलेल्या घटकांचा शोध हे यान घेणार आहे. मार्चमध्ये चांद्रयान-3 अंतराळ यानानं प्रक्षेपणाच्या वेळी आलेल्या तीव्र कंपनं (Strong vibrations) आणि ध्वनी कंपनांना तोंड देण्याची क्षमता प्रमाणित करण्यासाठी आवश्यक असलेल्या चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या.
पूर्वीपेक्षा काय फरक?
चांद्रयान 2 मिशनमध्ये वापरल्या गेलेल्या पूर्वीच्या लँडरच्या तुलनेत सध्याच्या लँडरमध्ये विविध प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. नवीन लँडरमध्ये आता पाच ऐवजी चार मोटर्स असणार आहेत आणि काही सॉफ्टवेअर अॅडजस्टमेंटही करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागचं लँडर आणि रोव्हर, विक्रम आणि प्रज्ञान यांची नावं इसरो कायम ठेवणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. चांद्रयान 3मध्ये हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (SHAPE) पेलोड अतिरिक्त उपकरणं जोडण्यात आली आहेत. हे उपकरण चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या वर्णक्रमीय आणि ध्रुवीय मोजमापांचा अभ्यास करण्यासाठी असणार आहे.
— ISRO (@isro) July 5, 2023
उद्दिष्ट काय?
इस्रोने चांद्रयान 3 मोहिमेसाठी तीन मुख्य उद्दिष्टं निश्चित केली आहेत. या उद्दिष्टांमध्ये चंद्रावर सुरक्षित आणि सुटसुटीत लँडिंग यशस्वीरित्या साध्य करणं, चंद्राच्या पृष्ठभागावर फिरण्याची रोव्हरची क्षमता प्रदर्शित करणं आणि थेट साइटवर वैज्ञानिक निरीक्षण करणं या सर्व बाबींचा समावेश आहे.