Stock Market Closing On 5th January 2023: भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला आहे. बाजाराने खालच्या पातळीवरून पुनरागमन केले असले तरी, एकेकाळी सेन्सेक्समध्ये 600 अंकांची तर निफ्टीमध्ये 150 अंकांची घसरण झाली होती. पण आजच्या व्यवहाराअंती सेन्सेक्स 304 अंकांनी घसरून 60 हजार 353 वर तर, एनएसईचा (NSE) निफ्टी 51 अंकांनी 18 हजाराच्या खाली 17 हजार 992 अंकांवर बंद झाला. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्स 940 अंकांनी तर निफ्टी 240 अंकांनी घसरला आहे.
कोणत्या शेअरचा दर वाढला आणि कोण पडले? (Which shares fell in price and which rose in price?)
आज बाजारात ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल, एनर्जी सेक्टरच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. तर बँकिंग, आयटी, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही चढता क्रम दिसून आला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 14 समभाग वाढीसह बंद झाले तर 16 तोट्यासह बंद झाले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 31 समभाग वर तर 19 समभाग खाली आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजचे तांत्रिक संशोधन विश्लेषक नागराज शेट्टी यांनी सांगितले की, सकाळी बाजार सकारात्मकतेने उघडला, परंतु तो कायम राखण्यात अपयशी ठरला आणि संपूर्ण सत्रात बाजार कमजोर राहिला. निफ्टी 17 हजार 892 च्या स्तरावरून सावरला आणि 18 हजारांच्या खाली बंद झाला. ते म्हणाले की, तांत्रिकदृष्ट्या बाजारात घसरण सुरूच राहू शकते.
आजच्या ट्रेडिंग सत्रात आयटीसीचे (ITC) शेअर 1.91 टक्क्यांनी, एनटीपीसीचे (NTPC) शेअर 1.77 टक्क्यांनी, एचयुएलचे (HUL) शेअर 1.75 टक्क्यांनी, महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर 1.27 टक्क्यांनी वधारले. तर, बजाज फायनान्सचे शेअर 7.21 टक्क्यांनी, बजाज फिनसर्व्हचे शेअर 5.10 टक्क्यांनी, आयसीआयसीआय बँकेचे शेअर 2.22 टक्क्यांनी, इन्फोसिसचे शेअर 1.32 टक्क्यांनी घसरले.
शेअर बाजारात दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले असले तरी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी झेप आली आहे. बीएसईवर (BSE) सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅपिटल 282.03 लाख कोटी इतके आहे. तर बुधवारी ते 281.61 लाख कोटी रुपये होते.