जागतिक मंदीचा परिणाम अनेक मोठमोठ्या कंपन्यांवर झाला आहे. परिणामी या कंपन्यांना कॉस्ट कटिंगचा निर्णय घेऊन नोकरकपात करावी लागली आहे. याच आर्थिक मंदीचा फटका स्टार्टअप्स उद्योगांनाही बसला आहे. पुरेसे फंडिंग उपलब्ध न झाल्याने अनेक नामांकित स्टार्टअप्स कंपन्यांनी नोकरकपात करायला सुरुवात केली आहे. नोकऱ्या उपलब्ध करून देणारी कंपनी Careernet कडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च 2023 या दरम्यान अनेक स्टार्टअप्स कंपन्यांनी फंडिंगच्या कमतरतेमुळे कमीतकमी 9,400 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.
स्टार्टअप्स फंडिंगमध्ये 71.6 टक्के घट
सध्या मार्केटमधील अस्थिर परिस्थितीमुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी स्टार्टअप्स कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे बंद केले आहे. यामुळे स्टार्टअप्स उद्योगांना पैशाची चणचण भासू लागली आहे. वाढता खर्च कमी करण्यासाठी कंपन्यांनी कॉस्ट कटिंगचा निर्णय घेतला असून कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.
तज्ज्ञांच्या मते, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्टार्टअप्स कंपन्यांच्या फंडिंगमध्ये 71.6 % घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी या कंपन्यांनी मार्केटमधून 12 बिलियन डॉलर उभे केले होते. ज्यामध्ये सध्या घट झाली आहे. ही घट पकडून कंपन्यांना केवळ 2.1 बिलियन डॉलर इतकीच रक्कम उभारता आली आहे.
'या' स्टार्टअप उद्योगांना बसला फटका
जानेवारी ते मार्च, 2023 या तिमाहीमध्ये 70 टक्क्यांहून अधिक स्टार्टअप्स कंपन्यांनी त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 100 ते 300 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. ज्यामध्ये Dunzo, Ola, SaaS या कंपन्यांचा समावेश आहे. तसचे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांमध्ये Unacademy, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Share Chat, ई-लर्निंग प्लॅटफॉर्म Byju's, कार सर्व्हिसिंगची सुविधा पुरविणारी GoMechanic, अपार्टमेंट प्लॅटफॉर्म कंपनी MyGate आदी कंपन्यांचा समावेश आहे.
नोकरभरती मंदावली
Careernet च्या डेटानुसार, अनेक स्टार्टअप्स कंपन्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वरिष्ठ पदांच्या नोकरभरतीत 80 टक्क्यांनी घट केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या पदावरील व्यक्तीचे पॅकेज हे 50 लाखाहून जास्त आहे. सध्या स्टार्टअप्स कंपन्यांना पुरेसे फंडिंग मिळत नसल्याने नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. ही परिस्थिती पुढील काही दिवस अशीच राहण्याची शक्यता आहे. शिवाय नोकरभरतीची प्रक्रिया ही संथ राहू शकते, असे Careernet चे सह-संस्थापक आणि सीईओ अंशुमन दास यांना वाटते.
Source: abplive.com