Fake Drug companies India: भारतीय फार्मा कंपन्यांनी तयार केलेल्या औषधांमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप उझबेकिस्तान आणि गांबिया या देशांनी काही दिवसांपूर्वी केला होता. भेसळयुक्त कफ सिरप म्हणजेच खोकल्याचे औषध मुलांच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचं या देशांनी म्हटले होते. या प्रकरणाचा तपास जागतिक आरोग्य संघटनेनेही केला होता. त्यात भारतीय कंपन्या दोषी आढळल्यानंतर औषध नियामक संस्थेने अनेक फार्मा कंपन्यांची तपासणी केली होती. यात आता भेसळयुक्त औषधे बनवणाऱ्या 76 कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तसंस्थेने सरकारी सुत्रांच्या हवाल्याने या बाबतचे वृत्त दिले आहे. 76 देशी फार्मा कंपन्यांचे परवाने रद्द किंवा निलंबित करण्यात आल्याचे म्हटले आहे. कारवाई केलेल्या कंपन्यांकडून भेसळयुक्त किंवा बनावट औषधे तयार करण्यात येत असल्याचे तपासात समोर आले होते. याची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने कारवाई केली. कोणत्या कंपन्यांविरूद्ध कारवाई केली याची माहिती सरकारने दिली नाही.
भारताची प्रतिमा डागाळली
गांबियामध्ये 70 मुलांचा आणि उझबेकिस्तानमध्ये 19 मुलांचा मृत्यूला भारतीय फार्मा कंपन्यांनी तयार केलेले औषध कारणीभूत असल्याचे समोर आल्यानंतर भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर डागाळली. जागतिक बाजारात भारतीय फार्मा कंपन्यांची प्रतिमा पूर्वीपासून चांगली आहे. कोरोना काळातही भारताने गरीब आणि विकसनशील देशांना औषधे आणि कोरोना लस पुरवली. मात्र, बनावट औषधांमुळे फार्मा कंपन्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
भारताला ‘फार्मसी ऑफ द वर्ल्ड’ असं म्हटले जाते. कारण, मागील दशकभरात भारतामध्ये औषधांची निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. औषधांची निर्यातही दुपटीने वाढली आहे. 2021-22 आर्थिक वर्षात भारताने 24 कोटी डॉलरपेक्षा जास्त औषधांची निर्यात केली आहे. (Fake Drug companies India) मात्र, यातील काही कंपन्या सरकारी परवाने न घेता, आवश्यक त्या चाचण्या पूर्ण न करता भेसळयुक्त औषधे तयार करत आहेत. औषध तयार करता स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) चे पालन करावे लागते. याचे उल्लंघन होत असल्याचेही समोर आले आहे.
भारतातील प्रतिष्ठित सन फार्मा या कंपनीला अमेरिकेच्या औषध विभागाने सक्त ताकीद दिली होती. नियमांचे पालन केले नाही तर अमेरिकेत औषधे विक्री करू देणार नाही, असे सन फार्मा कंपनीला सुनावले होते. मोठ्या कंपन्यांकडून जर हलगर्जीपणा होत असले तर छोट्या कंपन्यांकडून नियम डावलून काम करण्याचे प्रकार किती घडत असतील, याची कल्पना करू शकता.
भारतात फार्मा कंपन्या किती? (How many Pharma Companies are in India)
भारतामध्ये दहा हजारांपेक्षा जास्त फार्मा कंपन्या आहेत. यातील बनावट किंवा भेसळयुक्त औषध बनवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केली जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मंडाविया यांनी म्हटले.
सरकारला उशीरा जाग
भारतीय फार्मा कंपन्यांकडून बनावट औषधांची निर्मिती केल्याचे तपासात पुढे आल्यानंतर आता सरकारला जाग आली आहे. औषध निर्मितीसाठीचे नियम आणि मानके सुधारण्यासाठी 7 कोटी डॉलरपेक्षा जास्त पैसे खर्च करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. जागतिक आरोग्य संस्थेनेही भारतीय फार्मा कंपन्यांच्या गुणवत्तेवरून चिंता व्यक्त केली.