एक वेळ अशी होती जेव्हा भारताला दुधासाठी अन्य देशांवर अवलंबून राहावं लागत होतं. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने दुग्ध उत्पादनात अशी काही क्रांती केली की आज दुध उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. जगातील एकूण दुध उत्पादनात भारताचा वाटा थोडा थोडका नाही तर 23% आहे. 1970 साली प्रति व्यक्ती 107 ग्राम उत्पादन होत होते, आता हे उत्पादन प्रति व्यक्ती 427 ग्राम इतके आहे. याचे सगळे श्रेय 1970 साली भारतात झालेल्या श्वेत क्रांतीचे, दुग्ध क्रांतीचे आहे.
Table of contents [Show]
काय होती श्वेत क्रांती?
श्वेत क्रांतीला दुग्ध क्रांती म्हणून देखील ओळखले जाते. 13 जानेवारी 1970 ला गुजरातमध्ये डॉ. वर्गीस कुरियन यांच्या नेतृत्वाखाली दुग्ध व्यवसायात एक प्रयोग केला गेला. डॉ. वर्गीस कुरियन हे नेशनल डेयरी डेवलपमेंट बोर्डचे अध्यक्ष होते. गाय, म्हैस, शेळी अशा दुग्ध उत्पादक प्राण्यांचे संकर करून दुध उत्पादन वाढवणे आणि दुधाचे संकलन करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणे हे या क्रांतीचे उद्दिष्ट होते. पशुपालन हा शेतीला एक जोडधंदा म्हणून पुढे आणण्यास श्वेत क्रांतीने, धवल क्रांतीने महत्वाची भूमिका बजावली.
कोणती राज्ये आघाडीवर?
नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार भारतात दुग्ध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान हे राज्य आहे. तिसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश, चौथ्या क्रमांकावर गुजरात तर पाचव्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचा नंबर लागतो. हरित क्रांतीत (Green Revolution) आघाडीवर असलेल्या पंजाबचा दुग्ध उत्पादनात सहावा क्रमांक आहे.
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत झाली
धवल क्रांतीचा सर्वात मोठा सकारात्मक बदल हा ग्रामीण भागात पहायला मिळाला. ग्रामीण भागात पूरक आणि एक अतिरिक्त उत्पन्न म्हणून पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाऊ लागले. एक नियमित व विकेंद्रीत रोजगार म्हणून दुग्ध व्यवसाय नावारूपाला येऊ लागला. ग्रामीण भागातील महिलांसाठी ही रोजगार मोठी संधी ठरली. दुध आणि दुधापासून बनलेले दही, तूप, ताक, पनीर अशा वस्तूंचे उत्पादन आणि विक्री मुख्यत्वे महिलांच्या हाती असल्याने आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम झाल्याचे चित्र देखील बघायला मिळाले.
अतिरिक्त उत्पादन वाढले
शेतीला एक जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायाकडे बघितले जाऊ लागले. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करून लोक पैसे कमवू लागले. जनावरांचे शेण, लेंड्या, केरकचरा यातून शेणखत तयार होते. तसेच त्यावर गोबर गॅस प्लँट देखील बसवता येतो. शेतीसाठी खताचे उत्पादन घरातच केले जाऊ लागले आणि गोबर गॅस प्लँटच्या मदतीने घरातच गॅस निर्मितीची व्यवस्था देखील केली जाऊ लागले. त्यामुळे खतावरचा आणि गॅसवरचा खर्च कमी होऊ लागला आणि पर्यायाने अतिरिक्त उत्पादन वाढले.