भारताय नागरिकांचा टीव्ही(TV) खरेदी करण्याचा कल वाढला आहे. स्मार्ट फोन सध्या मनोरंजनाचे साधन झाले असले तरीही त्याचा टीव्ही पाहणाऱ्यांच्या संख्येवर काही परिणाम दिसून येत नाही. 2023 च्या पहिल्या सहामाहीमध्ये भारतात टीव्हीच्या मागणीत 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंटरनॅशन डेटा कॉर्पोरेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतात जवळपास 4.5 दशलक्ष दूरदर्शन भारतात पाठवण्यात आल्याची माहिती आहे. 2022 या संपूर्ण वर्षात 9.8 दशलक्ष टीव्हीचे युनिट्स भारतात आयात झाले होते.
सण उत्सव, ऑफर्सचा प्रभाव
इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC) च्या अहवालानुसार, भारतात मागील वर्षभराच्या आकडेवारीच्या तुलनेत 2023 मधील पहिल्या सहामाहीमध्ये टीव्हीची मागणी 8 टक्क्यांनी वाढली आहे. अनेक इलेक्ट्रिकल्स कंपन्यांकडून टीव्हीचे वेगवेगळे मॉडेल आणि त्यामधील फीचर्समध्ये सातत्याने बदल करत आहेत. त्यामुळे भारतात नवीन टीव्ही खरेदीसाठी चालना मिळत आहे. त्यातच भारतात सण उत्सव काळात जुन्या टीव्ही बदलून नवीन स्मार्ट टीव्ही (Smart TV) खरेदीलाही प्राधान्य दिले जात असल्याने ही मागणी वाढली असल्याचे अहवालात म्हटले आहे. आगामी सण उत्सवाच्या काळात यामध्ये आणखी वाढ होईल अशी अपेक्षाही या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, यासाठी ग्राहकांना सवलतींच्या ऑफर्सदेखील उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे IDC ने म्हटले आहे.
ऑनलाईन विक्रीमुळे 39% वाढ
सध्या अनेक ई कॉमर्स कंपन्याकडून वेगवेगळ्या ऑफर्समध्ये ग्राहकांना टीव्ही उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळेच ऑनलाईन टीव्ही खरेदी करण्याऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे.2023 च्या उत्सव काळातील ऑनलाईन टीव्ही विक्री 39 टक्क्यांवर पोहोचली असल्याचेही IDC ने आपल्या अहवालात म्हटले आहे.
स्वस्तात स्मार्ट टिव्ही
सध्या स्मार्ट टिव्हीची मागणी वाढली आहे. पॅनेलच्या कमी झालेल्या किमती तसेच कंपन्यांच्या स्पर्धेमुळे ग्राहकांना स्मार्ट टीव्ही स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. त्यामुळे आता ग्राहकांकडून जुने टीव्ही बदलून स्मार्ट टीव्ही विकत घेण्यास प्राधान्य दिले जात आहे. तसेच 32-इंच आणि 43-इंचाच्या टीव्हीची ऐवजी आता 55-इंचाच्या टीव्हीच्या मागणीत वाढ झाली आहे. एक वर्षापूर्वी 9 असलेली विक्री आता 12 टक्के झाली आहे.