जागतिक सुवर्ण परिषदेच्या (वर्ल्ड गोल्ड काऊन्सिल) अहवालानुसार, मागील वर्षाच्या तुलनेत 2022 च्या पहिल्या सहामाहीत सोन्याच्या मागणीत चांगली वाढ झाली होती. त्यादरम्यान विविध अडथळ्यांवर मात करत सोन्याच्या मागणीत पुरेशी वाढ झाली होती. पण 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याच्या मागणीत 8 टक्क्यांनी घट होऊन मागणी ती 948 टनांवर आली. 2021 मध्ये पहिल्या सहा महिन्यात सोन्याच्या मागणीत 12 टक्क्यांनी वाढ होऊन मागणी 2189 टनांवर पोहोचली होती. जागतिक पातळीवर सोने खरेदीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या देशांनी सोन्याची खरेदी कमी केल्यामुळे त्याच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, सोन्याच्या आयातीची मागणी घटल्याने भारतातील व्यापार तूट कमी होण्यास मदत होऊ शकते आणि त्यामुळे भारतीय रुपयाला आधार मिळू शकतो.
एप्रिल, 2022 मध्ये काही दिवस सोन्याची होती. पण त्यानंतर घडून आलेल्या राजकीय घडामोडी आणि वाढती महागाई यामुळे एप्रिलनंतर सोन्याच्या दरामध्ये पुन्हा घट होऊ लागली. वाढते व्याजदर आणि त्याचवेळी डॉलरची होत असलेली दमदार वाटचाल यामुळे सोन्याचे दर घसरू लागले. या काळात सोन्याच्या किमतीत 6 टक्के घट झाली; त्याचा परिणाम गोल्ड ईटीएफवरही दिसून आला.
दरम्यानच्या काळात रुपयाच्या मुल्यामध्ये होत असलेल्या सततच्या घसरणीमुळे आणि सराफावरील आयात शुल्कात वाढ झाल्यामुळे स्थानिक पातळीवर सोन्याच्या किमतीत वाढ होऊ लागली आहे. याचाही फटका सोन्याच्या मागणीला बसण्याची शक्यता जागतिक सुवर्ण परिषदेच्या (वर्ल्ड गोल्ड काऊन्सिल) अहवालात नोंदवण्यात आले.
धार्मिक सण आणि लग्न सोहळ्यांमुळे मागणीत वाढ!
2022 च्या पहिल्या 3 महिन्यात कोरोनाच्या 2 वर्षांनंतर साजरे होणारे लग्नसोहळे, अक्षय्य तृतीया तसेच जैन धर्मियांच्या सणामुळे सोन्याची खरेदी वाढली होती. 2022 च्या पहिल्या सहामाहीत सोन्याचा वापर 42 टक्क्यांनी वाढून 306.2 टन झाला. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने यापूर्वी 2022 मध्ये भारताचा सोन्याचा वापर 800 ते 850 टन होईल असा अंदाज वर्तवला होता. पण दुसऱ्या सहा महिन्यात या मागणीत घट होत आहे, असे वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने म्हटले आहे.
जूनमध्ये महागाई दर 7.01 टक्क्यांवर
भारताचा किरकोळ महागाई दर जून 2022 मध्ये 7.01 टक्के होता. तो मे 2022 मध्ये 7.04 टक्के होता, असे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (Ministry of Statistics and Programme) प्रसिद्ध केलेल्या जारी केलेल्या माहितीमधून दिसून आले. महागाईचा दर सलग सहाव्या महिन्यात रिझर्व्ह बँके (RBI)च्या 6 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा अधिक आहे.
2022 च्या दुसऱ्या सहामाहीत सोन्याची मागणी घटत आहे; पण त्यात वाढ होण्याची संधी ही आहे. सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित स्वरूपाची गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे याची मागणी निश्चितच वाढेल. सध्या अनेक देशांची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे, ग्राहकांकडून होणारी मागणी काही प्रमाणात कमी राहण्याची शक्यता आहे, असे मत जागतिक सुवर्ण परिषदेचे (वर्ल्ड गोल्ड काऊन्सिल) वरिष्ठ संशोधक लुईस स्ट्रीट यांनी व्यक्त केले.
IMAGE SOURCE - https://bit.ly/3oDItPZ