Basmati Rice Exports: कोरोना साथ संपल्यापासून जगभरात तांदळाचे दर वाढले आहेत. त्यामुळे अनेक देशांनी निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. देशांतर्गत तांदळाचा तुटवडा होऊ नये याकडे प्रामुख्याने तांदूळ उत्पादक देशांचे लक्ष आहे. ऑगस्ट महिन्यात भारताने निर्यातक्षम बासमती तांदळाचा प्रति टन दर 1200 डॉलर इतका वाढवला होता. मात्र, हा दर पुन्हा खाली आणला आहे.
देशांतर्गत बासमती तांदळाचा तुटवडा होऊ नये, तसेच दर नियंत्रणात रहावेत यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता. मात्र, आता निर्यात होणाऱ्या बासमती तांदळाचा किमान निर्यात दर प्रति टन 950 डॉलर इतका केला आहे. अडीचशे डॉलरची कपात दरामध्ये केली आहे. किमान निर्यात दर कमी करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी लावून धरली होती.
पाकिस्तानची निर्यात वाढण्याची भीती
जगभरात सुंगधी बासमती तांदळाची निर्यात भारताबरोबर पाकिस्तानही करतो. मात्र, भारताचा तांदूळ महागल्याने पाकिस्तानची निर्यात वाढली होती. कारण, जागतिक बाजारपेठेत पाकिस्तानी तांदूळ स्वस्त झाला होता. बासमती तांदळाच्या निर्यातीचं मार्केट पाकिस्तान काबीज करतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता भारताने निर्यातीचे दर कमी केल्याने पुन्हा बासमती तांदळाची निर्यात वाढण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा'
ऑल इंडिया राइस एक्सपोर्टर असोसिएशनने दर कमी करण्याची मागणी लावून धरली होती. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे व्यापाऱ्यांनी दर कमी करण्याची मागणी केली होती. सोमवारी झालेल्या बैठकीनंतर गोयल यांनी व्यापाऱ्यांची मागणी मान्य केली होती. दरम्यान, शेतकऱ्यांना मालाचा चांगला भाव मिळाला पाहिजे यावरही लक्ष द्यावे लागले, असे पीयूष गोयल यांनी बैठकीत सांगितले. तांदळाच्या दराचा सातत्याने आढावा घेऊन त्यानुसार पुन्हा निर्णय घेण्यात येईल, असेही वाणिज्य मंत्र्यांनी स्पष्ट केले.
देशांतर्गत तांदळाच्या किंमती कमी करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात सरकारने किमान निर्यात दर 1200 डॉलर करण्याचा निर्णय घेतला होता. आता निर्यातीचे दर कमी केल्याने पुन्हा भारतीय तांदूळ जागतिक बाजारात स्पर्धात्मक दराने विकला जाईल. मागील वर्षी भारताने सर्वाधिक तांदूळ पश्चिम आशियाई देश आणि अमेरिकेला विकला होता.