फेब्रुवारीमध्ये रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात प्रतिदिन 1.6 दशलक्ष बॅरल इतकी विक्रमी वाढ झाली आहे. व्हर्टेक्साच्या मते, भारताला आयात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या एक तृतीयांशहून अधिक तेलाचा पुरवठा एकटा रशिया करतो. सलग 5 व्या महिन्यात भारताला कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठा करणारा हा एकमेव देश आहे. फेब्रुवारी 2022 पूर्वी भारताच्या तेल आयातीत रशियाचा वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी होता. पण, फेब्रुवारी मध्ये तो 35 टक्क्यांवर पोहोचला आहे. सौदी अरेबियातून होणारी आयात 16 टक्क्यांनी कमी झाली आणि अमेरिकेची आयात 38 टक्क्यांनी कमी झाली.
आयात प्रतिदिन 1.6 दशलक्ष बॅरलवर
भारत रशियाकडून जेवढे तेल आयात करतो ते इराक आणि सौदी अरेबियाच्या एकत्रित आयातीपेक्षा जास्त आहे. हे देश अनेक दशकांपासून पुरवठादार आहेत. इराकने फेब्रुवारीमध्ये दररोज 9,39,921 बॅरल आणि सौदी अरेबियाने 6,47,813 बॅरल प्रतिदिन पुरवठा केला आहे. इराक आणि सौदी अरेबियाकडून गेल्या 16 महिन्यांतील हा सर्वात कमी पुरवठा आहे. फेब्रुवारीमध्ये यूएईने दररोज 4,04,570 बॅरलचा पुरवठा करून अमेरिकेला मागे टाकले आहे.
2020-21 या महामारीच्या काळामध्ये भारतातील पेट्रोलियम उत्पादनांच्या मागणीपैकी 84 टक्क्यांहूनही अधिक मागणीची (कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने) आयातीद्वारे पूर्तता करण्यात आली. 2020-21मध्ये 77 दशलक्ष अमेरिकन डॉलर किंमतीच्या 239 दशलक्ष मेट्रिक टन पेट्रोलियमची आयात करण्यात आली होती. ही आयात एकूण आयतीच्या 19 टक्के अशी होती. तर 2019-20 मध्ये 85 टक्क्यांहून अधिक पेट्रोलियम उत्पादनांची मागणी ही आयातीद्वारे पूर्ण करण्यात आली होती. याच वर्षी 119 दशलक्ष अमेरिकन डॉलर किंमतीच्या 270 मेट्रिक टन पेट्रोलियमची आयात करण्यात आली तसेच, ही आयात एकूण आयातीच्या तब्बल 25 टक्के इतकी होती. 2006-07 या वर्षात 145 मेट्रिक टनची आयात करण्यात आली होती जी एकूण आयातीच्या 77 टक्के इतकी होती. या तुलनेत 2020 ते 2022 मध्ये होणारी आयातीतील वाढ लक्षणीय दिसली आहे.
2000 या दशकाच्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या आयातीचे वाढते प्रमाण भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दोन प्रमुख बाह्य घटकांशी संबंधित असल्याचे दिसून आले. जगातील सर्वात मोठे तेलाचे साठे आणि भारताच्या आयातीचा सर्वाधिक भाग हा आखाती देशांमधून येत असतो. या प्रदेशातील राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेचा परिणाम म्हणून या प्रदेशातून येणार्या तेलाच्या पुरवठ्यात खंड पडण्याची भीती वर्तवण्यात आली. तसेच दूसरा घटक म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीमधील वेगाने होणारी वाढ होय. तेल निर्यातदार प्रदेशामधील अस्थिरता, तेल उत्पादक देशांनी आणलेल्या योजनांमुळे पुरवठ्यात पडलेला खंड आणि काही राष्ट्रांवर घालण्यात आलेली बंधने ही तेल आयातीत खंड पडण्याची अशी काही इतर कारणे आहेत. याचा परिणाम म्हणून किंमतीच्या जोखमीपेक्षा तेल पुरवठ्यातील जोखमीला प्राधान्य देण्यात आले आहे आणि त्याच दृष्टीने तेल आयात बास्केटचे विविधीकरण आणि जगभरातील इक्विटी ऑइल असेट्सचे संपादन यासारख्या धोरणांद्वारे त्यावर उपाय शोधले जात आहेत.