Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World Tourism Day 2023: हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत विविधतेनं नटलेल्या भारतात पर्यटकांची मांदियाळी

World Tourism Day 2023

जगभर पर्यटनास चालना देण्यासाठी जागतिक पर्यटन दिवस 27 सप्टेंबरला साजरा केला जातो. शाश्वत विकासाबरोबच आर्थिक उलाढाल, रोजगाराच्या संधी पर्यटनातून निर्माण होतात. तसेच एखाद्या देशाचं सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक वैभव अनुभवण्याची संधी पर्यटनातून मिळते. भारतातील पर्यटन क्षेत्राचा आढावा लेखामध्ये घेण्यात आला आहे.

World Tourism Day 2023: आज 27 सप्टेंबर, जागतिक पर्यटन दिन आहे. जगभरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. एखाद्या देशाचे भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पैलू अनुभवायचे असतील तर मनसोक्त फिरा हा संदेश या दिनाच्या निमित्ताने दिला जातो. 

भारतामध्ये 42 जागतिक वारसा स्थळे आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक वारसा स्थळे आणि इतरही अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी भारतात येतात. तसेच भारतातून परदेशात जाणाऱ्यांची संख्याही कोटींच्या घरात आहे. 

जागतिक पर्यटन दिनाची थीम कोणती?

जागतिक पर्यटन दिन 1980 पासून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संस्थेने (UNWTO) सर्वप्रथम 1980 साली पहिल्यांदा पर्यटन दिन साजरा केला. तेव्हा पासून दरवर्षी एक थीम घेऊन हा पर्यटन दिन साजरा केला जातो. "ग्रीन इनव्हेस्टमेंट" ही या वर्षीच्या पर्यटन दिनाची थीम आहे. पर्यटनाच्या शाश्वत विकासातून जनता आणि पृथ्वी दोघांचाही फायदा व्हावा, असे या थीममधून अभिप्रेत आहे. 

भारतातील पर्यटनाची स्थिती काय?

उत्तरेकडील हिमालय ते दक्षिणेतील कन्याकुमारीपर्यंत भारत विविधतेने नटलेला आहे. बर्फाळ हिमालय, पश्चिम घाट, घनदाट ईशान्य भारत, राजस्थानचे वाळवंट आणि विशाल समुद्र किनारा अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे भारतात आहेत. सोबतच पाककृती, संस्कृती, पोशाख, भाषा, रहाणीमान यामध्ये विविधता आहे. त्यामुळेच जगभरातून दरवर्षी लाखो पर्यटक भारतात देतात. 

कोणत्या देशातील पर्यटक सर्वाधिक भारतात येतात?

2022 साली भारतामध्ये 60 लाखांपेक्षा जास्त परदेशी पर्यटक आले. 2021 मध्ये कोरोना संसर्गामुळे पर्यटकांची संख्या कमी झाली होती. मात्र, 2022 साली पर्यटन क्षेत्राने पुन्हा उभारी घेतली. 2023 मध्ये परदेशी पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिका, बांग्लादेश, युके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, पोर्तुगाल, नेपाळ, अफगाणिस्तान या देशांतून सर्वाधिक पर्यटक भारतात येतात. 

परदेशी पर्यटकांची फेवरेट डेस्टिनेशन

युनेस्कोने भारतातील 42 पर्यटन स्थळे जागतिक वारसा यादीत घेतली आहे. अनेक प्राचीन मंदिरे, लेण्या, नॅशनल पार्क, डोंगरदऱ्या आणि ऐतिहासिक शहरांचा यात समावेश आहे. राजधानी दिल्ली, आग्रा, जयपूर, उदयपूर, जोधपूर, जैसलमेर, लडाख, सिक्कीम, मनाली, मुन्नार, हंपी, मुंबई शहर, रनथंबोर नॅशनल पार्क, ऋषिकेश, वाराणसी, सुवर्ण मंदिर, गोवा यासह विविध प्रसिद्ध स्थळांना भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भारतात येतात. 

परदेशात जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या किती?

2022 साली सुमारे 2 कोटी भारतीय नागरिक परदेशात फिरण्यासाठी गेले. कोरोनात ही संख्या खाली आली होती. मात्र, कोरोनापूर्वी ही संख्या अडीच कोटींपेक्षा जास्त होती. कोरोनापूर्व संख्या अद्याप गाठली नसली तरी 2023 मध्ये रेकॉर्ड ब्रेक पर्यटक परदेशात जातील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

परदेशात जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. थायलँड, सिंगापूर, मालदीव, युएई, अमेरिका, इंग्लड, फ्रान्स, स्वित्झरलँड, इटली, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांमध्ये सर्वाधिक भारतीय पर्यटक जातात. शेजारील नेपाळ, भूतान आणि श्रीलंकेत जाणाऱ्यांची संख्याही जास्त आहे.  

भारताच्या पर्यटन क्षेत्राची उलाढाल 

2021 साली फोर्ब्ज मासिकाने भारताला जगातील सातवा सर्वाधिक सुंदर देश म्हटले. पन्नास देशांच्या यादीत भारत 7 व्या क्रमांकावर होता. पर्यटन क्षेत्राचा भारताच्या जीडीपीमध्ये सुमारे 6.23% वाटा आहे. तर एकूण पर्यटन क्षेत्राची उलाढाल 215 बिलियन डॉलर इतकी होती. 2021 सालच्या आकेडवारीनुसार पर्यटन क्षेत्राने 3 कोटींपेक्षा जास्त लोकांना रोजगार दिला आहे.