Small Saving Scheme: केंद्र सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदरांमध्ये 10 ते 30 बेसिस पॉईंटने वाढ केली. हे नवीन दर जुलै-सप्टेंबर, 2023 या तीन महिन्यांसाठी राहणार आहेत. हे नवीन दर लगेच उद्यापासून म्हणजे 1 जुलै, 2023 पासून लागू होतील.
केंद्र सरकारने अल्प बचत योजनांच्या व्याजदरात वाढ करताना कालावधीवर आधारित वाढ केली आहे. दोन वर्षांच्या बचत योजनांमध्ये 10 बेसिस पॉईंटने तर 5 वर्षांच्या आवर्ती ठेव (Recurring Deposit) योजनांमध्ये 30 बीपीएसने वाढ केली आहे. तर ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme-SCSS), भविष्य निर्वाह निधी (Public Privident Fund-PPF), किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra-KVP) आणि सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Scheme) या योजनांवरील व्याजदरात काहीच वाढ केलेली नाही. त्याचबरोबर मासिक उत्पन्न योजना (Monthly Income Scheme-MIS) आणि राष्ट्रीय बचत योजना (National Savings Scheme-NSS) या योजनांच्या व्याजदरातही बदल केलेले नाही.
केंद्र सरकार अल्प बचत योजनांवरील व्याजदराचा प्रत्येक 3 महिन्यांना आढावा घेत असते आणि त्यानुसा त्यात बदल करते. आज सरकारने जाहीर केलेले हे व्याजदर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत लागू असतील. मागील एप्रिल-जून 2023 या तिमाहीत केंद्र सरकारने अल्प बचत योजनांवरील व्याजदरात 70 बेसिस पॉईंटने वाढ केली होती.
पोस्टाच्या आवर्ती ठेव योजनेवर मागील तिमाहित 6.2 टक्के व्याज मिळत होते. ते आता 6.5 टक्के करण्यात आले आहे. तर पोस्टाच्या 1 वर्षाच्या टाईम स्कीमवरील व्याजदर 6.8 वरून 6.9 टक्के केला आहे. तर दोन वर्षांच्या टाईम स्कीमचा व्याजदर 6.9 वरून 7 टक्के केला आहे. या व्यतिरिक्त इतर सर्व योजनांवरील व्याजदर जैसे थे ठेवले आहेत.
पीपीएफ योजनेवरील व्याजदरात एप्रिल-जून 2020 पासून वाढ केलेली नाही. पूर्वी पीपीएफवर 7.9 टक्के व्याज मिळत होते. ते सरकारने 7.1 टक्क्यांवर आणले आहे. पीएफवर गेल्या वर्षी 8.1 टक्के व्याजदर होता. दरम्यान मागे पार पडलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) विश्वस्तांच्या बैठकीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.15% व्याजदर देण्याची शिफारस सरकारकडे करण्यात आली आहे.