भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार सरकारी बँकामध्ये तब्बल 35 हजार कोटींच्या ठेवी या दावा न केल्याने पडून आहेत. यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे कित्येक खातेदारांच्या नामनिर्देशित व्यक्तीची (Nominee) नोंदच झालेली नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे बँक खाते उघडताना, कोणतीही मूदत ठेव ठेवताना अथवा कोणत्याही आर्थिक योजनेत गुंतवणूक करताना नॉमिनीची नोंद करणे आवश्यक आहे. जर तुम्ही अद्याप नोंद केली नसेल तर तुम्ही ती पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी नॉमिनीची नोंद कशी करायची जर संयुक्त खाते असेल तर नॉमिनी नोंद करताना काय करावे लागते याची माहिती जाणून घेऊ..
नॉमिनी म्हणजे काय?
बँक खातेदाराने किंवा विमा पाॉलिसीधारकांने त्याच्या पश्चात एखाद्या व्यक्तीला खात्याशी अथवा त्यातील गुंतवणुकीशी संबंधित व्यवहाराचे अप्रत्यक्ष अधिकार देणे म्हणजे त्या व्यक्तीला नॉमिनी म्हणून नियुक्त करणे होय. समजा जर खातेदाराचा मृत्यू झाला, तर त्याने ज्या व्यक्तीचे नाव नॉमिनी म्हणून नियुक्त केले आहे. त्या व्यक्तीला संबंधित खातेदाराच्या मालमत्तेच्या अथवा ठेवीच्या व्यवहाराचे अधिकार प्राप्त होतात. काही वेळा नॉमिनीची फक्त एक संरक्षक किंवा मार्गदर्शक म्हणूनही निवड केली जाऊ शकते.
कोणाला करता येते नॉमिनी?
खातेदार, गुंतवणूकदार किवा विमा पॉलिसीधारक एखाद्या व्यक्तीची नॉमिनी म्हणून आपल्या वारसांची किंवा एखाद्या विश्वासहार्य व्यक्तीची नाव नामनिर्देशित करू शकतो. कायदेशीर वारसांमध्ये पत्नी, मुले,आई, वडील, भाऊ, बहीण,त्यांची मुले इत्यादींचा समावेश होतो. तसेच जर नॉमिनी करण्यात आलेली व्यक्ती वारसापैकी नसेल तर त्याला संपत्ती अथवा ठेवींचे अधिकार प्राप्त होत नाहीत. त्यावेळी तो कायेदशीर वारसांना संबंधित संपत्तीचे अधिकार प्राप्त करून देण्यासाठी एक संरक्षक विश्वस्त म्हणून काम करू शकतो.
बचत खाते आणि मूदत ठेवीसाठी नॉमिनी
तुम्ही बँकेमध्ये तुमचे बचत खाते उघडले असेल तर त्यावेळी तुम्हाला नॉमिनीचे नाव जोडणे अनिवार्य असते. तसेच तुम्ही बँकेमध्ये एखाद्या योजनेत एफडी करत असाल तर त्यासाठी देखील तुम्ही नॉमिनी देणे अनिवार्य आहे. नॉमिनीचे नाव देत असताना, त्याचे कागदोपत्री अचूक नाव, कायम स्वरुपीचा पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सविस्तर देणे गरजेचे आहे. जर तुम्ही नॉमिनीचे नाव दिले नसेल तर तुम्ही संबंधित बँकेत जाऊन नॉमिनीचे नाव जोडू शकता. त्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागेल. तसेच तुम्ही ऑनलाईन देखील नॉमिनीची माहिती भरू शकता. यासाठी तुम्हाला संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन तुमचे नेट बँकिंगचे खाते लॉगिन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्याच्या समरीमध्ये (Account summary) Nominee या पर्यायवर क्लिक करावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला ज्या व्यक्तीची नॉमिनी म्हणून नोंद (add new Nominee) करायची आहे. त्याची सर्व माहिती भरावी लागेल. त्यानंतर ती माहिती सेव्ह केल्यानंतर तुमच्या बचत खात्यात किंवा मूदत ठेवीसाठी नॉमिनीचे नाव जोडले जाईल. जर तुम्हाला नॉमिनीचे नाव बदलायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन अशाच पद्धतीने बदलू शकता.
संयुक्त खाते असेल तर काय?
जर तुमचे खाते हे जर सुयुंक्त खाते असले तरीही तुम्ही नॉमिनी म्हणून नाव देऊ शकता. यासाठी नॉमिनी म्हणून ज्याचे नाव द्यायचे आहे. त्या नावासाठी सर्व खातेदार किंवा ठेवीदारांची संमती असणे गरजेचे आहे. निवडलेल्या नॉमिनीच्या नोंदीसाठी सर्व खातेधारकांची सही असणे देखील गरजेचे आहे.