Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Home Loan घेतलेल्या व्यक्तीचे निधन झाल्यास, कागदपत्रे कुणाला मिळणार? RBI चा हा नियम जाणून घ्या

Home Loan

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार कर्जाची संपूर्ण परतफेड केल्यानंतरची घराची कागदपत्रे कर्जदार व्यक्तीला दिले जातात. मात्र होम लोन सुरु असतानाच कर्जदार व्यक्तीचे निधन झालं आणि त्याच्या ऐवजी जी व्यक्ती कर्जाचे हफ्ते भरण्यास तयार होते त्यांना कर्जफेडीनंतर मालमत्तेची कागदपत्रे हस्तांतरित केली जातात.

स्वतःच्या मालकीचे घर असावे असे कुणाला वाटत नाही? आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न असतं की स्वतःच्या इच्छेनुसार, स्वतः डिजाईन केलेलं घर घ्यावं, ते सजवावं, त्यात संसार करावा, घरच्यांना खुश ठेवावं. यासाठी आपण आटापिटा करतो, कर्ज काढतो, रात्रंदिवस मेहनत घेतो. होम लोन मिळवण्यासाठी तर कितीतरी अडचणी येतात. वेगवेगळी कागदपत्रे बँकेला सादर करावी लागतात. बिल्डरची काम करण्याची शैली, कामाचा आवाका, दिलेल्या सोयीसुविधा यांवर देखील नजर ठेवावी लागते. या सगळ्या दिव्यातून आपल्याला आपल्या घराचा ताबा मिळत असतो.

मात्र गृह कर्ज घेतलं आणि ते फेडत असतानाचा आपल्याला काही बरं-वाईट झालं तर? सगळं काही सुरळीत चालू असताना आपल्या स्वप्नांना कुणाची दृष्ट लागू नये असं सगळ्यांनाच वाटत. मात्र याबाबत थोड प्रॅक्टिकल व्हायला हवं. सध्याची कामाची शैली, प्रवास, आजारपण, साथीचे रोग आदी विषयांचा बारकाईने अभ्यास केला तर कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपल्यानंतर गृहकर्ज घेतलेल्या आपल्या परिवाराच काय होणार याचा विचार करायलाच हवा.

मृत्यू झाल्यास काय होते?

तुमच्यावर जर गृहकर्ज असेल आणि दुर्दैवाने तुमचा कुठल्या कारणाने आकस्मिक मृत्यू झाला तर बँका तुमचे कर्ज माफ करत नाही हे लक्षात असू द्या. तुम्ही स्वतःचा जीवन विमा जर काढला असेल तर त्या रकमेतून तुमचे कायदेशीर वारसदार गृहकर्जाची रक्कम बँकेला परतफेड करू शकतात. जर तुमचा विमा नसेल आणि घरात तुम्हीच एकटे कमावते असाल तर तुमच्या कुटुंबियांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

राहिलेली कर्जाची रक्कम भरण्यास तुमचे कुटुंबीय समर्थ आहेत किंवा नाही याची खातरजमा बँक करून घेते आणि कर्जाचे हफ्ते घरातील कुणी भरण्यास तयार असेल तर होम लोन शिफ्ट केले जाते. मात्र कर्जाचे हफ्ते भरण्यास कुणी सक्षम नसेल तर बँक तुमच्या घराचा ताबा घेऊ शकते. त्यामुळे स्वतःचा जीवन विमा जरूर काढून ठेवा, जेणेकरून तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबियांना आर्थिक ताण सहन करावा लागणार नाही.

घराची कागदपत्रे कुणाला मिळणार?

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार कर्जाची संपूर्ण परतफेड केल्यानंतरची घराची कागदपत्रे कर्जदार व्यक्तीला दिले जातात. मात्र होम लोन सुरु असतानाच कर्जदार व्यक्तीचे निधन झालं आणि त्याच्या ऐवजी जी व्यक्ती कर्जाचे हफ्ते भरण्यास तयार होते त्यांना कर्जफेडीनंतर मालमत्तेची कागदपत्रे हस्तांतरित केली जातात.

तुमच्या पश्चात जी व्यक्ती मालमत्तेवर हक्क सांगणार आहे आणि कर्जाचे हफ्ते भरणार आहे, ती व्यक्ती कायदेशीर वारसदार म्हणजेच रक्तातील नात्यातील व्यक्ती असणे गरजेचे आहे.

कर्जाची परतफेड केल्यानंतर निधन झाल्यास?

जर कुणा व्यक्तीने कर्जाची परतफेड केली आणि बँकेकडून घराची, मालमत्तेची कागदपत्रे त्यांनी घेतलीच नसतील, अशा व्यक्तीचे निधन झाल्यास काय होईल? याचे उत्तर देखील आरबीआयने दिले आहे. सदर व्यक्तीच्या कायदेशीर वारसदारांची भेट घेणे आणि त्यांना ही कागदपत्रे हस्तांतरित करणे हे कर्ज देणाऱ्या बँकेचे काम असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. कर्ज परतफेडीनंतर 30 दिवसांच्या कालावधीत बँकांना हे काम करायचे आहे.

याकामी बँकांनी दिरंगाई केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा नियम देखील आरबीआयने केला आहे. कर्जाची परतफेड केल्यानंतर, 30 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक दिवसासाठी 5 हजार रुपयांचा दंड भरपाई म्हणून ग्राहकांना द्यावा लागेल असे आरबीआयने आपल्या आदेशात म्हटले आहे.