Increase in interest rate on loans: सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेने (IDBI Bank) आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. 12 जानेवारीपासून या बँकेचे कर्ज महाग झाले आहे. महामनीने मागील आठवड्यातच बँक ऑफ बरोदाचे कर्जावरील व्याजदर वाढल्याची बातमी दिली होती आणि लगेच या आठवड्यात आडीबीआय बँकेने दरात वाढ केल्याचे दिसून आले आहे.
बँकेने निधीची किरकोळ किंमत आधारित कर्ज दरामध्ये (MCLR: Marginal Cost of Funds Based Lending Rate) 20 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. एमसीएलआर (MCLR) वाढल्याने गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज महाग होणार आहे. रेपो रेट वाढवल्यानंतर अनेक बँकांनी एमसीएलआरमध्ये वाढ केली आहे.
आयडीबीआय बँकेच्या (IDBI Bank) अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन एमसीएलआर दर 12 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहेत, म्हणजे गुरुवारपासून हे नवे दर लागू झाले आहेत. एमसीएलआरमधील वाढ थेट कर्जधारकांच्या कर्जावर परिणाम करणार आहे. ज्यामुळे समान मासिक हप्ता (EMI: Equated monthly installment) वाढणार आहे.
आयडीबीआय बँकेचे नवीन दर (New Rates of IDBI Bank)
आयडीबीआय बँकेने एका रात्रीत एमसीएलआर 7.65 टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. एका महिन्याच्या एमसीएलआरसाठी 7.80 टक्के तर, 3 महिन्यांसाठी 8.10 टक्के आणि 6 महिन्यांच्या एमसीएलआरसाठी 8.30 टक्के दर निश्चित करण्यात आला आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी 1 वर्षांच्या एमसीएलआरवर 8.40 टक्के, 2 वर्षांच्या एमसीएलआरवर 9 टक्के आणि 3 वर्षांच्या एमसीएलआरवर 9.40 टक्के निश्चित केले आहे.
एमसीएलआर वाढल्याने मुदत कर्जावरील ईएमआय वाढवणार असल्याचे दिसून येत आहे. बहुतेक ग्राहक कर्जे एका वर्षाच्या किरकोळ खर्चावर आधारित कर्जदरावर आधारित असतात. अशा परिस्थितीत एमसीएलआर वाढल्यामुळे वैयक्तिक कर्ज, वाहन आणि गृह कर्ज महाग होऊ शकते.
विशेष म्हणजे, एमसीएलआर ही भारतीय रिझर्व्ह बँकेने विकसित केलेली एक पद्धत आहे, ज्याच्या आधारे बँका कर्जासाठी व्याजदर ठरवतात. त्याआधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठी व्याजदर निश्चित करत असत.