खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे. आयसीआयसीआय बँकेला 31 मार्च अखेर संपलेल्या तिमाहीत 9121.9 कोटींचा नफा झाला. बँकेच्या नफ्यात 30% वाढ झाली. ब्रोकर्स कंपन्या आणि शेअर बाजार विश्लेषकांनी चौथ्या तिमाहीत आयसीआयसीआय बँक 8540 कोटींचा नफा मिळवेल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात बँकेची कामगिरी सरस ठरली. बँकेच्या संचालक मंडळाने प्रती शेअर 8 रुपयांचा डिव्हीडंड जाहीर केला आहे.
दरम्यान, तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी 21 एप्रिल 2023 रोजी आयसीआयसीआय बँकेच्या शेअरवर दबाव दिसून आला होता. ICICI Bank चा शेअर दिवसअखेर 885.65 रुपयांवर बंद झाला होता. त्यात 0.98% घसरण झाली. मात्र तिमाही कामगिरी दमदार राहिल्याने सोमवारच्या सत्रात बँकेच्या शेअरवर त्याचे पडसाद उमटतील, असे शेअर दलालांनी म्हटले आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत ICICI बँकेला निव्वळ व्याजातून (Net Interest Income) 17667 कोटींचे उत्पन्न मिळाले. त्यात 40.2% वाढ झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेला 12605 कोटींचे व्याज उत्पन्न मिळाले होते. चौथ्या तिमाहीत बँकेच्या एकूण कर्ज वितरणार 20.5% वाढ झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजुला बुडीत कर्जांसाठी केलेली तरतूद चिंता वाढवणारी आहे. चौथ्या तिमाहीत बँकेची तरतूद 51.5% वाढली असून हा आकडा 1619 कोटींपर्यंत वाढला आहे. चौथ्या तिमाहीत काही प्रमाणात वसुली वाढल्याचे बँकेने म्हटले आहे.
जानेवारी ते मार्च 2023 या काळात बँकेच्या ठेवींमध्ये 10.9% वाढ झाली. चौथ्या तिमाहीतील नेट इंटरेस्ट मार्जिन 4.90% इतके होते. बँकेने शेअरहोल्डर्ससाठी प्रती शेअर 8 रुपये डिव्हीडंड देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात रेकॉर्ड डेटची घोषणा लवकरच केली जाईल, असे बँकेने म्हटले आहे.