क्रिकेट विश्वचषकाचा महासंग्राम अवघ्या दोन दिवसांवर असून चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे. तब्बल दीड महिना चालणाऱ्या या स्पर्धेत यंदा जाहिरातींमधून हजारो कोटी खर्च होणार आहेत. एका अहवालानुसार विश्वचषक स्पर्धेत जाहिरातींवर 2000 कोटींहून अधिक खर्च होण्याची शक्यता आहे.
येत्या 5 ऑक्टोबर 2023 पासून भारतात क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. ऐन दसरा आणि दिवाळी या सणासुदीत ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा भारतात होणार आहे. त्यामुळे बाजारामध्ये उत्साही वातावरण आहे. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी कॉर्पोरेट्सकडून देखील क्रिकेट वर्ल्ड कपवर लक्ष केंद्रीत केले जाईल, असे बोलले जाते.
वर्ष 2019 च्या क्रिकेट विश्वचषकापेक्षा यंदा कंपन्यांकडून जाहिरातींवर दुप्पट पैसे खर्च केले जातील. यामागचे मुख्य कारण दसरा-दिवाळीचा हंगाम आहे. यंदाच्या सणासुदीत कंपन्यांकडून जाहिरातींवर त्यांच्या बजेटच्या तुलनेत 10 ते 15% अधिक खर्च केले जातील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. क्रिकेट वर्ल्डकपमुळे यंदा जाहिरात उद्योगाची 8 ते 9% दरावे वृद्धी होईल, असा अंदाज आहे.
बड्या कंपन्यांकडून वर्षभरात जाहिरातींवर किती खर्च करावा याबाबत बजेट ठरवलेले असते. त्यापैकी 40 ते 45% खर्च हा सणसुदीमध्ये केला जातो. मात्र यंदा ऐन दिवाळीतच क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कंपन्याकडून 40 ते 45% ऐवजी 60 ते 70% खर्च केला जाईल, असा अंदाज एलारा कॅपिटलचे वरिष्ठ उपाध्यक्ष करण तौरानी यांनी व्यक्त केला.
डिजिटलचा बोलबाला वाढला असला तरी आजच्या घडीला टीव्ही अॅडर्व्हटायझिंग हेच प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान सारख्या हाय व्होल्टेज सामन्यात 10 सेकंदाच्या टीव्ही अॅडचा दर हा तब्बल 30 लाख रुपये इतका आहे.
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 साठी डिजिटल जाहिरातीचा दर हा एक हजार इंप्रेशनसाठी 230 ते 250 रुपये इतका आहे. मागील विश्वचषकावेळी म्हणजेच 2019 हा दर 140 ते 150 रुपये इतका होता. डिजिटल प्लॅटफॉर्मवरील जाहिरातींचा खर्च हा तुलनेने कमी असल्याने अनेक छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्या डिजिटल जाहिरातींसाठी खर्च करत आहेत.
यंदाच्या क्रिकेट विश्वचषकाचे थेट प्रसारणाचे हक्क डिस्ने हॉटस्टारला मिळाले आहे. डिस्ने हॉटस्टारने क्रिकेट विश्वचषकासाठी 21 स्पॉन्सर मिळवले असून 500 हून अधिक कंपन्यांनी जाहिरातींसाठी करार केला आहे. यात महिंद्रा अॅंड महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर, ड्रीम 11, बुकिंगडॉटकॉम यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.