डिजिटल व्यवहार वाढायला हवेत, अर्थव्यवसस्था रोकडरहित (कॅशलेस एकॉनॉमी) होण्याच्या दिशेने जायला हवी, असे तुम्ही गेल्या काही वर्षापासून ऐकत आले असाल. आता तर डिजिटल व्यवहार वाढू लागले आहेत हेही खरेच. मात्र, याचा एक साईड इफेक्ट झाला असून सुट्ट्या पैशांमुळे बँका त्रस्त झाल्या आहेत. हा साईड इफेक्ट म्हणजे बँकांकडे साठून राहत असलेला चिल्लरचा खच. या एवढ्या नाण्यांचा करायचं तरी काय, असा प्रश्न बँकाना सतावू लागलाय. बँकानाच नव्हे तर काही मोठ्या देवस्थानांनाही याची चिंता वाटतेय. एखाद्या मोठ्या सण उत्सवानंतर मंदिराकडे जमा होणाऱ्या नाण्यांचे प्रमाण वाढते.
डिजिटल व्यवहारांशी याचा काय संबंध?
डिजिटल व्यवहाराअभावी बाजारात आपण मोठ्या प्रमाणात चिल्लर वापरायचो. मात्र आता किरकोळ खरेदी केल्यावरही आपण पैसे भरण्यासाठी खिशातला मोबाइल बाहेर काढतो. अर्थात हे काही वाईट नाही. रोकडरहित अर्थव्यवस्थेच्या (कॅशलेस इकॉनॉमी) दिशेनेच आपण जायला हव, किंबहुना नोटबंदी झाली तेव्हा हा त्याचा एक महत्वाचा उद्देश होता. मात्र, याचा साइड इफेक्ट म्हणून सुट्या पैशांची आवश्यकता कमी झाली आहे. सुट्या पैशांविषयीच्या धोरणात सुधारणा आवश्यक आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. एकूण व्यवहारांच्या तुलनेत नोटा व नाणी यांचे योग्य प्रमाण असायला हवे. यामुळे हा प्रश्न सुटू शकेल.
बँका म्हणतात चिल्लर नको रे देवा, मंदिरांनी लढवली अशी शक्कल
चिल्लर बँकांकडे साठू लागली आहे. सामान्यपणे देवस्थाने आपल्याकडील रोख रक्कम बँकांमध्ये मुदत ठेवीसाठी जमा करत असतात. मात्र ही चिल्लर घेण्यास बँका उत्सुकता दाखवत नायेत. काही देवस्थानांनी मात्र यावर एक तोडगा काढला आहे. चिल्लर घेणार असाल तरच तुमच्या बँकेत ‘मुदत ठेव’ अशी भूमिका घेतली आहे. शिर्डीच्या साईबाबांचे मंदिर हे याचे एक ताजे उदहरण आहे. प्रसिद्ध मंदिरात दानपेट्यांमध्ये सुटे पैसे मोठ्या प्रमाणात जमा होतात. म्हणजे लाखो रुपयांच्या मुदत ठेवी मिळवण्यासाठी बँकेला किती माणसे पाठवावी लागतील ही कल्पना न केलेलीच बरी आहे.
बँकेत पैसे काढायला जाताय?
आता बँकांमध्ये जाऊन पैसे काढणाऱ्या ग्राहकांची संख्या तशीही कमीच होत चालली आहे. पण, समजा तुम्ही पैसे काढण्यासाठी बँकेत जायचे असेल आणि तुम्हाला मोठी रक्कम काढायची असेल तर चिल्लरसाठी एखादी पिशवी बरोबर घेऊन जायला हवी का, असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल. कारण बँका तरी या पैशांच दुसर काय करणार? पण, तुम्हाला याची इतकी काही काळजी करण्याची गरज सध्यातरी दिसत नाही.कारण यापूर्वीही बँकेचे कॅशियर चिल्लरच्या स्वरूपात काही रक्कम कधीतरी देतात, असा अनुभव तुम्हीही क्वचित घेतला असेल. मात्र, ग्राहकाला पैसे देताना नोटा आणि चिल्लर यांचा समतोल सामान्यत: बँक राखते.