तुम्ही कंपनीत रुजू झाल्यावर तुमच्या पगारातील ठरावीक रक्कम कट करुन ती EPF मध्ये जमा केली जाते. हा सरकारचा रिटायरमेंट सेव्हिंग्ज प्रोग्राम आहे. या निधीचे मॅनेजमेंट कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) करते. त्यामुळे सर्व कारभार सरकारच्या अंतर्गत असल्याने तुम्हाला रिटर्न ही चांगला मिळतो.
तसेच, पैसेही सुरक्षित राहतात. मात्र, तुम्हाला काही इमर्जन्सी आल्यास, अशावेळी तुम्हाला EPF मधून काही कारणांसाठी पैसे काढता येऊ शकतात. यामध्ये आर्थिक इमर्जन्सी, मेडिकल इमर्जन्सी, रिटायरमेंट, राजीनामा, शिक्षण, अपंगत्व, लग्न आणि घर खरेदी यांचा समावेश होतो.
या दोन पद्धतीने काढा EPF
तुम्हाला EPF मधून ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने पैसे काढता येतात. ऑफलाईन पद्धतीने पैसे काढण्यासाठी तुम्हाला EPF फाॅर्म भरून EPFO कार्यालयात जमा करणे आवश्यक असणार आहे. पण, आता EPFO पोर्टलवरुन बऱ्यापैकी सर्व कामे ऑनलाईन होत असल्याने, बरेचजण ऑनलाईन पैसे काढायला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ऑनलाईन पैसे कसे काढता येईल, हे आपण स्टेप-बाय-स्टेप जाणून घेणार आहोत.
पोर्टलवरुन EPF काढायच्या स्टेप्स
- स्टेप 1: EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि तुमचा UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आणि पासवर्ड वापरून EPF सदस्य पोर्टलवर साइन इन करा.
- स्टेप 2: "Online Services" टॅबवर क्लिक करा.
- स्टेप 3: ड्रॉप डाउन मेनूवर जा आणि "क्लेम (फॉर्म -31, 19, 10C आणि 10D)" पर्याय निवडा.
- स्टेप 4: तुमच्या गरजेनुसार पैसे काढण्याचा प्रकार निवडा (पूर्ण, अंशत: किंवा पेन्शन).
- स्टेप 5: "Proceed for Online Claim" वर क्लिक करा आणि तुमच्या बँक खात्याच्या माहितीसह आवश्यक माहिती टाकून ऑनलाईन क्लेम फॉर्म भरा.
- स्टेप 6: “Submit” बटणावर क्लिक करा.
- स्टेप 7: सबमिट केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.
- स्टेप 8: व्हेरिफिकेशन पेजवर ओटीपी टाका आणि तुमचा क्लेम सबमिट करण्याची अंतिम प्रक्रिया पूर्ण करा.
- स्टेप 9: EPFO ने तुमच्या क्लेमवर प्रक्रिया केल्यानंतर, काही दिवसांत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.
पैशांची अडचण असल्यास बाहेरून जेव्हा पैसे जमा होत नाही. अशावेळी तुमचे EPF मध्ये पैसे असेल तर तुम्ही ते ऑनलाईन सहज काढू शकणार आहात. ते कसे काढायचे हे आता तुम्हाला समजले असेल.