कर बचत आणि गुंतवणूक यादृष्टीने पीपीएफ ही सर्वात लोकप्रिय आणि सोपा उपाय मानला जातो. आपण केवळ वार्षिक पाचशे रुपये पीपीएफ खात्यात भरू शकता. तसेच कमाल दीड लाखांपर्यतची गुंतवणूक करून तेवढाच कर वाचवू देखील शकता. विशेष म्हणजे आपल्याला कर वाचवण्यासाठी कोणतेही वेगळे प्रयत्न करण्याची गरज भासत नाही. केवळ आपण पीपीएफमध्ये दरवर्षी पैसे जमा करा आणि कर वाचवा. कर लाभाचा विचार केल्यास या गुंतवणूकीवर कलम 80 सीनुसार सवलत मिळते. त्याचवेळी व्याजावर आणि मॅच्युरिटीपोटी मिळणार्या रक्मेवर देखील कर भरावा लागत नाही.
* लक्षात ठेवा, आपल्याला सलग पंधरा वर्ष गुंतवणूक सुरू ठेवावी लागते. आपण वार्षिक 500 रुपये देखील भरू शकला नाहीत, तर आपले पीपीएफ खाते बंद पडते. खाते बंद पडल्याने पीपीएफच्या माध्यमातून मिळणारे अन्य लाभ देखील मिळू शकत नाहीत. म्हणून करसवलत मिळण्यासाठी आणि सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनाचा आर्थिक आधार किंवा मुलांच्या शिक्षणासाठी एकरक्कमी पैसा हाती राहण्यासाठी पीपीएफमध्ये न चुकता गुंतवणूक करण्याची सवय बाळगायला हवी.
* दुर्देवाने आपण काही कारणांने पीपीएफ खाते सुरू ठेवू शकला नाहीत आणि पीपीएफ खाते निष्क्रिय झाले असेल तर आपण घाबरून जाण्याची गरज नाही. आपण बंद पडलेले खाते सहजपणे सुरू करू शकता. अर्थात यासाठी आपल्याला काही दंड भरावा लागेल.
* बंद पडलेल्या पीपीएफ खात्याव्यतिरिक्त नव्याने पीपीएफ खाते सुरू करायचे असेल तर त्यास परवानगी दिली जात नाही. एका व्यक्तीच्या नावाने दोन पीपीएफ खाते उघडता येऊ शकत नाहीत.
* पीपीएफ खाते पुन्हा सुरू करण्याचा मार्ग
पीपीएफ खाते पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्याला संबंधित शाखेत म्हणजेच पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जावे लागेल. या ठिकाणी खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी एक अर्ज भरावा लागेल. अर्थात केवळ अर्ज भरल्याने खाते सुरू होणार नाही तर आपल्याला दंड आणि फरकाची रक्कम देखील भरावी लागेल. फरकाची रक्कम ही आपण जितकी वर्षे किमान रक्कम भरली नाही, तेवढी रक्कम भरावी लागेल. याशिवाय आपल्याला दंड भरणा देखील करावा लागेल. हा दंड 50 रुपये वार्षिक प्रमाणे भरावा लागेल.
* दंड आणि फरकाचा हिशोब
पीपीएफच्या बाबतीत दंड आणि फरकाचा हिशोब अगदी सरळ आहे. उदा. आपले पीपीएफ खाते चार वर्षांपासून बंद असेल तर आपल्याला चार वर्षाच्या हिशोबाने दोन हजार रुपये भरावे लागतील. त्याचबरोबर दोनशे रुपये दंडही द्यावा लागेल. ही रक्कम भरणा झाल्यानंतर आपले पीपीएफ खाते पुन्हा सक्रिय होईल.
* निष्क्रिय खात्याचा फटका काय?
2016 मध्ये पीपीएफच्या नियमांत महत्त्वाचा बदल झाला आहे. यानुसार सरकारने काही विशेष स्थितीत मॅच्युरिटीच्या अगोदर पीपीएफ खाते बंद करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गंभीर आजारपण, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आदी कारणाने खाते बंद करता येते. पीपीएफ खात्याला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर खात्यातून पैसे काढता येतील. याशिवाय तिसर्या आर्थिक वर्षानतर सहाव्या आर्थिक वर्षांपर्यंत पीपीएफ खात्याच्या शिलकीवर कर्ज मिळू शकते. बंद पडलेल्या खात्यांवर मात्र ही सुविधा मिळत नाही.
Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you: