Investment in Real Estate: रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची म्हणजे सोपे नाही. यासाठी स्वत:कडे भरपूर पैसा असायला हवा किंवा बँकेकडून कर्ज मिळावी अशी ऐपत आणि फेडण्याची ताकद असावी. पण या दोन्ही गोष्टी एखाद्याकडे नसतील तर त्याला कधीच रिअल इस्टेटमध्ये गुंतवणक करता येणार नाही का? तर याचे उत्तर नाही असे आहे.
तुमच्याकडे घर किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याइतपत पैसा नसला तरी तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता. प्रॉपर्टी खरेदी करण्याव्यतिरिक्त भारतात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे इतरही पर्याय आहेत. त्यातील काही निवडक पर्याय आपण समजून घेणार आहोत.
Table of contents [Show]
रिअल इस्टेट इन्वेस्टमेंट ट्रस्ट (REITs)
भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये सध्या रिअल इस्टेट इन्वेस्टमेंट ट्रस्ट म्हणजेच रिट्सची (REITs) मागणी वाढू लागली आहे. ज्याप्रमाणे म्युच्युअल फंडची कोणतीही स्कीम अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करुन शेअर्स आणि बॉण्डमध्ये गुंतवणूक करते, त्याचप्रमाणे REIT देखील गुंतवणूकदारांकडून पैसे उभारून रिटेल इस्टेटमध्ये गुंतवणूक करते. रिट हे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे एक साधन आहे.
सुरूवातीला REIT मध्ये किमान 2 लाखांची गुंतवणूक करावी लागत होती. पण सेबीने यात हस्तक्षेप केल्यानंतर ती 50 हजार रुपयांवर आली होती. त्यानंतर सेबीने पुन्हा एकदा त्यात कपात करून आता ती सर्वसामान्यांना परवडेल अशी किमतीवर आणली आहे. म्हणजे अगदी 10 ते 15 हजार रुपयांमध्ये REIT च्या माध्यमातून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते.
रिअल इस्टेट म्युच्युअल फंड (Real Estate Mutual Fund)
म्युच्युअल फंडचे काम कसे चालते, हे तुम्हा सर्वांना माहिती आहेच. यामध्ये काही स्कीम या स्पेसिफिक एकाच सेक्टरमध्ये गुंतवणूक करतात. जसे की, गोल्ड फंड, थिमॅटिक फंड, डेब्ट फंड, टेक्नॉलॉजी फंड, फार्मा फंड. अगदी त्याचप्रमाणे रिअल इस्टेट म्युच्युअल फंड हे रिअल इस्टेटमधील कंपन्यांमध्ये किंवा त्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. अशाप्रकारे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून अगदी किमान गुंतवणुकीतून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते.
रिअल इस्टेट विक्रेता
रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये तर कोणतीही विशेष गुंतवणूक न करताही पैसे मिळवता येतात. अर्थात यासाठी तुमचा दांडगा जनसंपर्क असायला हवा. तसेच रिअल इस्टेटमधील प्रत्येक गोष्टीची तुम्हाला माहिती असायला हवी. घरांचा दर सध्या काय सुरू आहे. लोकांची मागणी किती आहे आणि त्याचा पुरवठा होऊ शकणारी घरे किती उपलब्ध आहेत. अशी माहिती तुमच्याजवळ असेल तर तुम्ही रिअल इस्टेट एजंट बनून रिअल इस्टेटच्या विक्रीतून चांगला नफा मिळवू शकता. त्याचबरोबर एखाद्या प्रॉपर्टीमध्ये किमान गुंतवणूक करून तुम्ही ती प्रॉपर्टी चढ्यादराने दुसऱ्याला विकू शकता.
रिअल इस्टेट ईटीएफ (Real Estate ETF)
शेअर मार्केटमध्ये स्टॉक्सप्रमाणे ईटीएफची सुद्धा खरेदी-विक्री होते. गोल्ड, सिलव्हर ईटीएफप्रमाणे Real Estate ETF आहेत. ज्याद्वारे तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. रिअल इस्टेट ईटीएफमधील कंपन्या कन्स्ट्रक्शन, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, व्यावसायिक प्रॉपर्टी आदींमध्ये गुंतवणूक करतात.
याशिवाय क्राऊडफंडिंग (Crowdfunding) ही एक नवीन संकल्पना समोर येत आहे. क्राऊडफंडिंग म्हणजे नातवाईक, मित्र-परिवार, गुंतवणूकदार यांच्याकडून पैसे जमा करायचे.पण या संकल्पनेचा उपयोग सामुहिक उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी केला जातो. अशाप्रकारे तुम्ही भरपूर पैसे नसतानाही रिअल इस्टेटमधील वेगवेगळ्या माध्यामातून अप्रत्यक्षपणे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता आणि त्यातून नफा देखील मिळवू शकता.