Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MIDC मध्ये बिझनेससाठी जागा कशी मिळवायची?

Business Plot in MIDC

एखाद्याला उद्योग सुरु करायचा असेल तर त्याला सरकारकडून एमआयडीसीमध्ये कमी किमतीत जागा मिळू शकते. यासाठी त्याला सरकारकडे रितसर अर्ज करावा लागतो. त्याची प्रक्रिया आपण समजून घेऊ.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (Maharashatra Industrial Development Corporation-MIDC) हे अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील औद्योगिक प्रगतीतील एक यशस्वी वाटेकरी आहे. राज्य सरकारच्या या महामंडळामुळे अनेकांचे उद्योजक (Industrialist) होण्याचे स्वप्न खरे झाले आहे. अनंत अडचणी, समस्या, अडथळे असले तरी राज्यातील अनेक भागात एमआयडीसीमुळे उद्योग उभारणीला चालना मिळाली, हे दिसून येते. अनेकांनी स्वस्तात जागा, सवलतीत वीज आणि इतर फायद्याच्या जोरावर उद्योगात झेप घेतली आहे.

तुम्हाला उद्योग सुरु करायचा असेल तर एमआयडीसीमध्ये तुम्हाला जागा मिळू शकते. त्यासाठी विहीत प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागते. https://www.midcindia.org/ या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला औद्योगिक भूखंड(Plot) मिळवण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करता येते. याठिकाणी कोणत्या एमआयडीसीमध्ये कुठे भूखंड मोकळा आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ किती, त्याचा दर काय, निविदा प्रक्रिया आणि इतर बाबींची माहिती मिळते.

एक खिडकी योजना (Single Window Clearance)

एमआयडीसीच्या संकेतस्थळावर तुम्हाला ऑनलाईन लँड अलॉटमेंट (Online Land Allotment) साठीची लिंक मिळेल. त्यावर क्लिक केल्यास पुढील प्रक्रिया समजून येते. तीन प्रकारे तुम्हाला भूखंड उपलब्ध असतो.तुम्हाला लँड बँक पोर्टलद्वारे(Land bank) भूखंड शोधता येतो. तसेच जीआयएस (GIS) पद्धतीने ही एमआयडीसीतील भूखंड शोधता येतो. आता तुमच्या गुंतवणुकीनुसार, भूखंड तुम्हाला प्राप्त करता येतो.

मोठी गुंतवणूक (Large Investment)

एखाद्या उद्योगाची मोठी गुंतवणूक असेल तर या पोर्टलवरुन तुम्ही जागा शोधू शकता. त्यानंतर रितसर प्रक्रिया राबवून तुम्हाला जागा पाहता येते. मोठ्या गुंतवणुकीसाठी महामंडळाच्या मार्केटिंग टीम, प्रादेशिक कार्यालय यांच्याशी संपर्क साधता येतो. गुंतवणुकीचा प्रस्ताव सादर करावा लागतो. भूखंडाचा पर्याय निश्चित करता येतो. विशेष योजनेतंर्गतची माहिती संकेतस्थळावर मिळते. त्यानंतर भूखंड वाटप औद्योगिक आणि वाणिज्य वापरासाठी करण्यात येते.

लहान आणि मध्यम गुंतवणुकीसाठी (Small & Medium Investment)

मध्यम,लहान आणि लघू गुंतवणूकदारांसाठी (Medium, Small, Micro plot) प्रक्रियेत थोडा बदल आहे. भूखंडाची निविदा निघते. संकेतस्थळ, जाहिरात याद्वारे त्याची माहिती देण्यात येते. तसेच संकेतस्थळावर भूखंड शोधता येतो. औद्योगिक, रहिवासी आणि वाणिज्य वापरासाठी भूखंड वाटप होते.

प्राधान्याने भूखंडाबाबतच्या अधिक माहितीसाठी (land.midcindia.org) तर ई-निविदेबाबतची अधिक माहिती (ebid.midcindia.org) यावर मिळू शकेल.

प्रक्रिया काय आहे? (What is the Process?)

भूखंड मिळविण्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यानंतर अर्जाची छाननी होते. भूखंड वाटप समितीची बैठक होते. त्यात तुमचं नशीब फळफळलं की भूखंड वाटप, अलॉट(Alot) होतो. देकार पत्र, अनामत रक्कम (Deposit Amount) वाटप पत्र, बीओपी पेमेंट, ए टू एल, ताबा, इमारत आराखडा मंजूरी, भोगावटा प्रमाणपत्र, अंतिम करारनामा कार्यान्वित  करण्यात येतो आणि भूखंड तुमच्या ताब्यात येतो.

ई-निविदा प्रक्रिया ही त्या एमआयडीसीसाठी अंमलात आणतात. ज्या ठिकाणी 80 टक्के भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. तर 20 टक्के भूखंडांचे वाटप बाकी आहे. त्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येते.

तर  ज्या एमआयडीसीमध्ये 80 टक्क्यांपेक्षा कमी भूखंडांची विक्री झालेली आहे. अशा एमआयडीसीत थेट भूखंड वाटप (Direct Allotment of Plots) करण्यात येते. भूखंड वाटप समिती त्यासाठी गठीत करण्यात आलेली आहे. ही समिती भूखंडाचे वाटप करते.  त्यासाठीची प्रक्रिया एमआयडीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तिसरा आणि महत्वाचा प्रकार म्हणजे प्राधान्याने करण्यात येणार भूखंड वाटप (Priority Allotment of Plots) होय. जागतिक दर्जाच्या कंपन्या, देशातील मोठे उद्योग, विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी, संरक्षण क्षेत्रातील कंपन्या, मोठ्या खासगी कंपन्या, मोठ्या कंपन्यांचा विस्तार करण्यासाठी हे भूखंड राज्य सरकार हाताशी ठेवते.

भूखंड वाटपाची जाहिरात दरवर्षी येते. वर्षांतून साधारणत: चार वेळा अशा जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. त्याचे वेळापत्रकच (Time Table) एमआयडीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असते.  त्यानुसार, जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात भूखंड वाटपाविषयीच्या जाहिराती प्रसिद्ध होतात. त्यानुसार तुम्हाला भूखंड मिळवण्यासाठी अर्ज करता येतो.

Image Source : https://bit.ly/3Cs3ROr