मोबाईल टॉवरच्या माध्यमातून तुम्ही दर महिना हजारो रुपये कमवू शकता हे आजवर अनेकदा तुम्ही ऐकलं असेल. परंतु यासाठी नेमके काय करावे लागते?कुठे अर्ज करावा लागतो? त्यासाठी काय प्रोसेस करावी लागते ही माहिती तुमच्यापैकी अनेकांना नसेल. चला तर या लेखात जाणून घेऊयात नियमित उत्पन्नाचे स्रोत म्हणून मोबाईल टॉवर हा पर्याय कसा फायदेशीर ठरू शकतो.
तुमच्या बिल्डींगच्या गच्चीवर किमान 500 स्क्वेअर फूट मोकळी जागा असल्यास किंवा तुमच्या मालकीच्या एखाद्या रिकाम्या जागेवर देखील तुम्हाला मोबाईल टॉवर लावता येऊ शकतो. एकदा की मोबाईल टॉवरसाठी तुम्ही अर्ज केला आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पडली की तुम्ही दरमहा10,000 ते 60,000 रुपये उत्पन्न भाडे म्हणून टॉवर कंपनीकडून घेऊ शकता.
तुमच्यापैकी अनेकांनी कधी ना कधी याबद्दल ऐकले असेल, तुमच्या आजूबाजूला असे टॉवर देखील पाहिले असतील. शेतात, रिकाम्या जागेवर असे मोबाईल टॉवर लावले जातात. यासाठी तुम्हाला स्वतःहून स्पेशल काही मेहनत करण्याचीही गरज नाही.
कुठे कराल अर्ज?
सध्या देशभरात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. देशातील मोबाईल वापर करणारी ग्राहकसंख्या लक्षात घेता अधिकाधिक नेटवर्क टॉवरची गरज आहे. खेडोपाड्यात डिजिटल सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत, इंटरनेट सुविधा नागरिकांना वापरता यायला हवी यासाठी भारत सरकारने ‘डिजिटल इंडिया’ हे अभियान सुरु केले आहे. त्यामुळे टेलिकम्युनिकेशन कंपन्यांनी दुर्गम भागात देखील मोबाईल नेटवर्क सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे जर तुम्हाला देखील तुमच्या मालकीच्या जागेवर मोबाईल टॉवर लावायचा असेल तर तुम्हाला थेट कंपनीकडे तसा अर्ज करावा लागेल.
फसवणुकीपासून सावधान!
गेल्या काही वर्षांपासून मोबाईल टॉवर बसवण्यासाठी काही सायबर चोर नागरिकांना मेसेज कॉल करून त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत. तुम्हाला देखील असा कुठला मेसेज किंवा कॉल आला असेल तर सावधान! तुम्हाला मोबाईल टॉवर लावायचा असेल तर थेट मोबाईल कंपनीशी संपर्क करा. कुठल्याही एजंटसोबत कसलेही आर्थिक व्यवहार करू नका. तुमच्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर मोबाईल टॉवर बसवण्यासाठी कुठलीही मोबाईल कंपनी तुमच्याकडून पैसे घेत नाही हे लक्षात असू द्या.
मोबाईल टॉवरसाठी निकष काय?
- जागा तुमच्या मालकीची असावी. अर्जदाराने सुचवलेल्या जागेची कागदपत्रे (सातबारा, नोंदणी दस्तऐवज) असणे आवश्यक आहे.
- तुमची जमीन ज्या परिसरात आहे तेथील स्थानिक पालिकेची एनओसी म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- ज्या बिल्डींगच्या छतावर टॉवर लावणार आहात त्या बिल्डींगचे स्ट्रक्चरल सेफ्टी सर्टिफिकेट आवश्यक आहे.
- मोबाईल टॉवर बिल्डींगच्या छतावर बसवायचा असेल तर किमान 500 चौरस फूट जागा आवश्यक आहे.
- मोकळ्या जमिनीवर मोबाईल टॉवर बसवायचा असल्यास 2000 चौरस फूट ते 2500 चौरस फूट जागा लागणार आहे.
- जमिनीचा आकार शहरी किंवा ग्रामीण भागात आहे यावर अवलंबून असतो. यानुसार मोबाईल टॉवरचा आकार देखील ठरवला जातो.
- ज्या जागेवर मोबाईल टॉवर लावायचा आहे तेथून 100 मीटर अंतरावर कुठलेही रुग्णालय असता कामा नये.
- दाट लोकवस्तीच्या परिसरात मोबाईल टॉवर लावण्याची परवानगी कंपनीकडून दिली जात नाही.
- मोबाईल टॉवरमधून निघणारे रेडिएशन लोकांसाठी धोकादायक ठरू शकतात, हे त्यामागचे कारण आहे.
कोणतीही टॉवर कंपनी तुम्हाला समोरून फोन करत नाही. टॉवर बसवण्यासाठी तुम्हाला कंपनीकडेच अर्ज करावा लागेल. यानंतर कंपनीचे लोक तुमच्या जमिनीची किंवा छताची पाहणी करण्यासाठी येतील. जर त्यांना सर्वकाही योग्य वाटले तर ते तुमच्याशी करार करतील. यानंतर, कंपनी तुम्हाला करारानुसार पैसे देईल.प्रत्येक कंपनीचा कराराचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. 5 वर्षे, 10वर्षे अशा कालावधीसाठी साधारणपणे मोबाईल कंपन्या करार करतात.